Saturday, July 27, 2024
Homeनगरसाईबाबा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दोन तास ठिय्या आंदोलन

साईबाबा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दोन तास ठिय्या आंदोलन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी साईबाबा संस्थानच्या साई निवास अतिथीगृहासमोर सोमवारी सकाळी दोन तास ठिय्या आंदोलन केले.

- Advertisement -

साईबाबा संस्थानच्यावतीने शिर्डी पंचक्रोशीतील नागरिकांचा मुला- मुलींसाठी शिर्डीत ज्युनियर आणि सिनियर कॉलेज चालवले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षापासुन या कॉलेजमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. ग्रंथालय आहे पण पुस्तके नाही, लॅबमध्ये साहित्याची कमी, क्रीडा मैदान नाही. तसेच अनेक वर्षांपासून प्रभारी प्राचार्य असल्याने तातडीने कायमस्वरूपी प्राचार्य आणि शिक्षकांची भरती करावी, सध्या प्रभारी असलेले प्राचार्यांची खुर्ची खाली करावी आणि नवीन प्राचार्यांची नियुक्ती करावी या मागण्या घेवुन साईबाबा संस्थानच्या सिनियर कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साई संस्थानच्या साई निवास अतिथीगृह समोर ठिय्या आंदोलन केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती

सोमवारी साईबाबा संस्थानच्यावतीने साई निवास अतिथीगृह येथे नवीन शिक्षक भरतीसाठी मुलाखती घेण्यात येणार होत्या. मुलाखतीची तयारी झाली शिक्षक देखील दाखल झाले अन् नेमकी त्याचवेळी विद्यार्थ्यांचा मोर्चा साईबाबा महाविद्यालयापासून पायी निघाला आणि अतिथी गृहाजवळ आला. अतिथीगृहाचे प्रवेश द्वारे बंद करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील न थांबता शताब्दी मंडपाकडे कूच केली आणि अचानक तीर्थप्रसाद लॉज शेजारील छोट्या प्रवेशद्वाराने विद्यार्थ्यांनी अतिथीगृहाकडे गनिमी कावा करत प्रवेश केला. सदरची बाब संस्थान सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आली नाही. विद्यार्थ्यांनी थेट अतिथीगृहात धडक मारली. यावेळी साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी व सुरक्षा अधिकारी कर्मचार्‍यांनी धावपळ करत या विद्यार्थ्यांना थोपविले आणि शताब्दी मंडपात जाण्याची विनंती केली. मात्र विद्यार्थ्यांनी काहीही न ऐकता जोरदार घोषणाबाजी करत सुरक्षारक्षकांच्या विनंतीला न जुमानता अतिथी गृहासमोर ठिय्या मांडला.

साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि महिला प्रशासकीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी आंदोलन स्थळी येत अधिकार्‍यांकडून आंदोलनाची माहिती घेतली व विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावले. विद्यार्थी प्रतिनिधी आणि कार्यकारी अधिकारी यांच्यात चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी अचानक आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने या आंदोलनाची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या