शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
श्री साईबाबा व साई संस्थान यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ तसेच आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करणार्या संबंधित व्यक्ती विरोधात शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
श्री. कोते यांनी फिर्यादीत म्हटले आहे, मी पाच दिवसांपूर्वी श्री साईबाबांबद्दल युट्युबवर एक व्हिडीओ पाहिला सदर व्हिडीओमध्ये जयपूर येथील प्रवक्ता गिरीधर स्वामीजी यांचे सदर व्हिडीओमध्ये प्रवचन सुरू आहे. सदर व्हिडीओमध्ये प्रवचनाच्या दरम्यान एक व्यक्ती गिरीधर स्वामी यांना प्रश्न विचारत आहे व प्रश्नामध्ये श्री साईबाबा हे देव आहे का? श्री साईबाबांची पूजा हिंदूंच्या मंदिरामध्ये करणे योग्य आहे का? अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यावर गिरीधर स्वामी यांनी श्री साईबाबा हे अफगाणिस्तानमधून आलेले आहेत.
ते मुस्लीम समाजाचे आहेत. त्यांचे नाव चाँदभाई आहे. त्यांनी आपला चेला गोविंद दाभोळकर यांच्याकडून आपले चरित्र लिहून घेतले. ते चरित्र साई संस्थानने प्रकाशीत केले. तसेच साईबाबा अफगाणिस्तानमध्ये मुसलमानाचे पुत्र आहे. तसेच 12 वर्षांचे वय असताना त्यांना इंग्रजांनी पकडून जेलमध्ये टाकले. तडजोड करून बाहेर आले. तसेच झाशीच्या राणीला मारण्याचे काम केले. तसेच लोकमान्य टिळक यांच्याकडे पाठवले. लोकमान्य टिळक यांनी श्री साईबाबांना मारले. त्यानंतर श्री साईबाबा शिर्डी आले व ते पाखंडी आहे, असा आक्षेपार्ह मजकूर त्यांनी प्रवचनामध्ये मांडला.
त्यामुळे साईभक्तांच्या व शिर्डी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे मला देखील सदर व्हिडीओ पाहून सदर गिरीधर स्वामी बद्दल प्रचंड द्वेष निर्माण झालेला आहे. सदर गिरीधर स्वामीने हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून प्रसारीत केलेला आहे. या व्हिडीओमधील प्रवचन मांडताना त्यांनी श्री साई सचरित्र या पवित्र ग्रंथाबद्दल देखील आक्षेपार्ह प्रसार केलेला आहे. यामुळे आमच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहे. ह व्हिडीओ चुकीचा आहे. श्री साईबाबांबद्दल व श्री साईबाबा संस्थानबद्दल त्यांनी ज्या पध्दतीने वक्तव्य केलेले आहे. ते कोणाच्याही बुध्दीला पटणारे नाही.
तसेच श्री साईबाबांच्या मंदिरामधील दान होणार्या नोटा बहुतांश भारतीय चलनाच्या आहे. तरी सदर व्हिडीओ व्हायरल करून गैरसमज व श्री साईबाबांबद्दल व श्री साई संस्थान बद्दल गैरसमज पसरवले जात आहे. या कारणाने सदर दोन्ही व्हिडीओची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तरी सदर व्हिडीओ तसेच मजकुरीय पोस्ट बाबत सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे, अशी मागणी कोते यांनी शिर्डी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत केली आहे.