Saturday, April 25, 2026
HomeनगरShirdi : साईबाबा रुग्णालयात प्रशासनाची मनमानी

Shirdi : साईबाबा रुग्णालयात प्रशासनाची मनमानी

डॉक्टर व कर्मचार्‍यांवरील दबाव थांबवा, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील- कैलासबापू कोते

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत चालणार्‍या साईबाबा व साईनाथ रुग्णालयात प्रशासनाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केला आहे. कामगार अधिकारी डोखे हे आपल्या अधिकाराच्या कक्षेबाहेर जाऊन डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचार्‍यांवर राउंडच्या नावाखाली दडपशाही करित आहेत. डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या संदर्भात वैद्यकीय संचालक व्यतिरिक्त कामगार अधिकार्‍याला राउंड घेण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
कैलासबापू कोते म्हणाले, साईबाबा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णसेवेसाठी कार्यरत असताना कामगार अधिकारी मनाला वाटेल त्यावेळी रुग्णालयात फेर्‍या मारतात.

- Advertisement -

जागेवर नसल्याचे कारण देत वेतन रोखण्याची धमकी दिली जाते. डॉक्टरांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय संचालक असताना एका गैरवैद्यकीय अधिकार्‍याने वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णालय कर्मचार्‍यांच्या कामात हस्तक्षेप करणे ही गंभीर बाब आहे, असे कोते म्हणाले. शिस्तीच्या नावाखाली दडपशाही सुरू आहे. डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवणे हा केवळ अधिकाराचा गैरवापर नसून संस्थानच्या प्रतिमेलाही धक्का देणारा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली. रुग्णालयातील वातावरण दिवसेंदिवस बिघडत असून अनेक अनुभवी डॉक्टरांसह कर्मचारीही नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्री. कोते यांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवरही निशाणा साधत संस्थानमध्ये काही पदांची वाटणी नियमापेक्षा मर्जीने झाल्याचे दिसते. कामगार अधिकारी पदासाठी आवश्यक पात्रता संबंधित अधिकार्‍याकडे आहे का, याची तातडीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांनी इशारा देताना स्पष्ट शब्दांत सांगितले, डॉक्टर आणि कर्मचार्‍यांवरील हा अन्याय तातडीने थांबवला नाही तर शिर्डी ग्रामस्थ शांत बसणार नाहीत. रुग्णसेवा धोक्यात आणणार्‍यांविरोधात ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी नागरिक लवकरच डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचेही कोते यांनी सांगितले.

डॉक्टर आणि कर्मचारी जर अशाच वातावरणामुळे रुग्णालय सोडून गेले तर त्याचा सर्वात मोठा फटका गोरगरीब रुग्णांना बसेल. त्यावेळी जबाबदार कोण? असा थेट प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला. साईबाबा रुग्णालयातील वाढत्या असंतोषामुळे संस्थानच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून डोखे यांना सीईओ यांनी आवरले नाही तर असंतोषाचा भडका उडेल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासन आता यावर काय भूमिका घेते याकडे कर्मचारी व शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.

साईबाबा रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि महिला पॅरामेडिकल कर्मचारीही कामगार अधिकारी डोखे यांच्या रडारवर असल्याचा आरोप कैलासबापू कोते यांनी केला आहे. अचानक राउंड येईल आणि जागेवर नसल्यास पगार कपात होईल, या भीतीने अनेक महिला कर्मचारी वॉशरूमला जाण्यासही घाबरू लागल्या आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. कोते म्हणाले, रुग्णालयातील कर्मचारी हे खुर्ची सांभाळण्यासाठी नसतात, तर रुग्णसेवेसाठी असतात. एवढे साधे भान प्रशासनाला नसेल तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. महिला कर्मचार्‍यांवरील दबाव थांबला नाही तर महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...