Wednesday, January 15, 2025
Homeनगरसाई मूर्तीचे होणार थ्रीडी स्कॅनिंग

साई मूर्तीचे होणार थ्रीडी स्कॅनिंग

मंदिर 20 डिसेंबरला दुपारी राहणार बंद || तज्ज्ञांची समिती स्थापन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साई समाधी मंदिरातील साईंच्या संगमरवरी मूर्तीची भविष्यात हुबेहूब प्रतिकृती तयार करता यावी, तसेच तब्बल सत्तर वर्षापूर्वी इटालियन मार्बलमध्ये घडविण्यात आलेल्या या मूर्तीची सद्यस्थिती काय आहे, याचा अंदाज यावा, यासाठी साई मूर्तीचे श्रीडी स्कॅनिंग केले जाणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील जाणकारांनी तशी शिफारस केली आहे. त्यानुसार तज्ज्ञाची एक समिती स्थापन करण्यात आली. ही समिती 20 डिसेंबरला साई मंदिरास भेट देऊन हे थ्रीडी स्कॅनिंग करणार आहेत. त्यामुळे दुपारी पावणेदोन ते साडेचार या कालावधीत साई मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाईल, अशी माहिती साई संस्थानच्या वतीने देण्यात आली.

- Advertisement -

साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय साईमंदिर परिसरात उभारण्यात आले आहे. संग्रहालयातील तसेच अन्य ठिकाणी असलेल्या साईबाबांनी वापरलेल्या वस्तुंचे अधिक काळ संवर्धन व्हावे, यासाठी त्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट प्रक्रिया करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी देखील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. त्यांनीच पाठविलेल्या कारागिरांकडून हे काम केले जात आहे. साईबाबांची पेंटिंग, त्यांचे फोटो, त्यांनी वापरलेल्या धातूच्या व कपड्यांच्या वस्तूंचा त्यात समावेश आहे.

त्याचाच एक भाग म्हणून साईंच्या संगमरवरी मूर्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. ही मूर्ती झिजली, तर नाही ना, यावर तज्ज्ञांचे मत मागविण्यात आले. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार गरम पाणी आणि दह्याचा वापर कमी करण्यात आला आहे. आता भविष्यात या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती उभारण्याची गरज भासल्यास तिचे थ्रीडी स्कॅनिंग केले जाणार आहे.

साईबाबा मंदिरातील संगमवरी असलेली साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरुवार दि. 7 ऑक्टोबर 1954 रोजी करण्यात आली असून या घटनेला आज 70 वर्ष पूर्ण झाली आहे. साई मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीवर नित्यानेमाने होणार्‍या पूजाअर्चा, दुग्धभिषेक यामुळे भविष्यात मूर्तीची झिज होऊ शकते. मात्र अद्यापपर्यंत मूर्तिकार तालीम यांनी तयार केलेल्या श्री साईबाबांच्या मूर्तिमध्ये काहीच फरक पडलेला नाही. तरीही कुठे इजा किंवा असा प्रसंग उद्भवल्यास या थ्रीडी स्कॅनवरून मूर्तीचे संवर्धन करू शकतो. म्हणून श्री साईबाबा समाधी मंदिरातील साईबाबांच्या संगमरवरी मूर्तीची थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करण्यात येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या