Monday, April 6, 2026
HomeनगरShirdi : साईबाबांचा अपमान करणारा अजय गौतम अखेर नतमस्तक

Shirdi : साईबाबांचा अपमान करणारा अजय गौतम अखेर नतमस्तक

साईंच्या चरणी लेखी माफी मागितली

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांवर शिर्डीचे आराध्य दैवत असलेल्या साईबाबांबद्दल सातत्याने अपप्रचार करून बदनामी करणार्‍या दिल्ली येथील अजय गौतम यांनी अखेर बुधवारी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आपल्या चुकीच्या विधानाबद्दल लेखी माफी मागितली आहे. साईबाबा संस्थानने दाखल केलेल्या दिवाणी आणि फौजदारी दाव्यानंतर गौतम यांनी राहाता न्यायालयात हजर होऊन पश्चाताप व्यक्त केला. त्यानंतर शिर्डीत येऊन दुपारच्या मध्यान्ह आरतीस हजेरी लावली आणि समाधीसमोर नतमस्तक होत कोट्यवधी साईभक्तांची क्षमा याचना केली.

- Advertisement -

समाज माध्यमातून मिळालेल्या चुकीच्या माहितीमुळे आपण भ्रमित झालो आणि त्या प्रभावाखाली येऊन बदनामीकारक विधाने केली, अशी स्पष्ट कबुली अजय गौतम यांनी न्यायालयात दिली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनी साई संस्थानचे माजी विश्वस्त व सल्लागार वकील अ‍ॅड. मोहन जयकर यांच्यासोबत शिर्डीत येऊन दर्शन घेतले. साईबाबांच्या दर्शनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजय गौतम यांनी मोठे आणि धक्कादायक विधान केले. माझ्या विधानांमुळे करोडो साईभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी माफी मागतो, असे सांगत त्यांनी आता ‘यू टर्न’ घेतला. यापुढे साईबाबांची बदनामी करणार्‍यांना थांबवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले. एवढेच नाही तर साईबाबांचे खरे चरित्र आणि शिकवणुकीवर आधारित पुस्तक तीन महिन्यांत लिहून त्याचा प्रचार करणार असल्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.

यावेळी त्यांनी 2014 मधील धर्म संसदेचा संदर्भ देत, आपला हा नवा अनुभव शंकराचार्यांना सांगणार असल्याचेही नमूद केले. साईबाबांच्या मंदिरात सर्व पूजा हिंदू परंपरेनुसार होतात आणि आरतीच्या वेळी काशी विश्वनाथ मंदिरात असल्याचा अनुभव येतो, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. साई संस्थानच्या या कायदेशीर लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, डेप्युटी सीईओ भीमराज दराडे, अ‍ॅड. मोहन जयकर, कमलाकर कोते, विधी अधिकारी गोरख नलगे, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आणि प्रसिद्धी अधिकारी तुषार शेळके यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांचे या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...