शिर्डी |वार्ताहर| Shirdi
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणार्या शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांच्या मूळ चर्म पादुका (Sai Baba Paduka) शिर्डी बाहेर नेण्यास विरोध दर्शविणार्या उच्च न्यायालयातील (High Court) अर्ज नामंजूर झाल्याने तीन राज्यातील 1800 किमीचा साई पादुका दर्शन सोहळा सुरु होण्याचा मार्ग सुकर झाला असून गुरुवारी सकाळी शिर्डीतून या पवित्र पादुकांचे विधिवत पूजन करून मोठ्या उत्साहात रवाना करण्यात आल्या.
विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्या साईबाबांच्या मूळ चर्म पादुकांचा तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील पुलियमपट्टी 10 ते 26 एप्रिल यादरम्यान पार पडणार्या दर्शन सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी विरोध करत याबाबत उच्च न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. साईबाबांचा प्रचार आणि प्रसारासाठी बाबांच्या मूळ पादुकांचे समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आदी ठिकाणी शिर्डी माझे पंढरपूर आरती करून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आल्या.
या पादुकांचा दर्शन सोहळा दक्षिण भारतातील महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) या तीन राज्यांसह सांगली, पेठ वडगाव, दावणगिरी, बंगळुरू, मल्लेश्वरम, सेलम, करून, पुलियमपट्टी, धर्मापुरी असे आठ शहरात सुमारे 1800 किमीचा प्रवास असणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले, शिर्डीत येणार भक्त बाबांवर अतिशय मनापासून प्रेम करतो. त्या अनुषंगाने त्या भाविकांची मागणी होती कि काही कारणास्तव शिर्डीत दर्शनासाठी न येऊ शकणार्या भाविकांसाठी हा पादुका दर्शन सोहळा आयोजित करावा. म्हणून खास या भक्तांच्या मागणीवरून भाविकांचे दर्शन आणि त्यांच्या कार्याचा प्रचार या उद्देशाने या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पादुका ज्या ज्या जिल्ह्यात जातील तिथे तेथील स्थानिक पोलीस सुरक्षा यंत्रणा सुरक्षा पुरवतील, असेही त्यांनी म्हटले. याप्रसंगी उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, हरिश्चंद्र कोते, प्रतापराव जगताप, अमृत गायके, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, विभाग प्रमुख विजय वाणी, अतुल वाघ आदींसह शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्तित होते.