शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
गेल्या काही महिन्यांपासून साईबाबांच्या पादुका राज्यात व परराज्यात त्याच शहरात व त्याच मंदिरात घेऊन जाण्यास साई संस्थान प्रशासनाचा अट्टाहास का? यामागचे गुपित अनेकांना कळले नसून साईबाबांच्या पादुका बाहेर गावी नेण्यास ग्रामस्थांचा व भक्तांचा विरोध असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. पादुकांचा बाहेरगावी नेण्याच्या निर्णयाविरोधात 7 वर्षापूर्वी प्रमोद गोंदकर, सर्जेराव कोते, सचिन शिंदे या ग्रामस्थांसह 12 ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले होते. परंतु, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी केल्याने 3 दिवसांनी ते उपोषण मागे घेण्यात आले होते. त्यानंतर काही वर्षे पादुका बाहेर गावी नेल्या नाहीत.
सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेकदा साईबाबांच्या पादुका राज्यात व परराज्यात घेऊन जाण्याचा सपाटा लावला आहे. प्रवासात पादुका घेऊन जाताना काही विपरीत झाल्यास भक्तांच्या भावना दुखावतील. जरी याचा लाखो रुपयाचा विमा काढला असला तरी या पादुका परत मिळतील का? असा सवाल भाविकांकडून केला जात आहे. एकीकडे हजारो वर्षापूर्वीच्या अनमोल ग्रंध, प्रतिमा, मूर्ती, सह अनेक वस्तू शस्त्रे, जपून ठेवून त्याची प्रचंड काळजी घेतली जाते. मात्र अधिकारी पादुका वाटेल तेव्हा, वाटेल त्या शहरात काही ठराविक ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे. पादुका दौरा झाला तरच शिर्डीत भक्त वाढतील असे संस्थान प्रशासनाचे म्हणणे आहे.
परंतु याउलट पादुका दौरा होत असताना भक्तांची संख्या शिर्डीत कमी होताना दिसत आहे. प्रमोद गोंदकर, सर्जेराव कोते व सचिन शिंदे यांसह ग्रामस्थांनी या पादुका शेगावचे गजानन महाराज यांचेप्रमाणे शिर्डीत सर्व भक्तांना माथा टेकवून दर्शनासाठी ठेवावे अशी मागणी बैठकीत केली होती. त्यावेळी कार्यकारी अधिकार्यांनी पादुका दौरा झाल्यावर निर्णय घेऊ असे म्हटले होते. परंतु त्यावर अनेक महिने झाले तरी संस्थानने दखल घेतली नाही. प्रमुख पदाधिकारी बैठकीत या प्रकाराबाबत गोपीनाथ गोंदकर यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचेकडे तक्रार केली होती. याबाबत ग्रामस्थांनी देखील नाराजी व्यक्त करत साईबाबांच्या पादुका बाहेरगावी नेवू नये, अशी मागणी केली आहे.
साईबाबा संस्थान प्रशासनाकडून शिर्डीत येणार्या भाविकांना योग्य प्रकारची वागणूक व शांततेत साई समाधीचे दर्शन मिळावे म्हणून उपाययोजना करणे गरजेचे असताना साई संस्थानचे अधिकारी तसेच कर्मचारी हे साईबाबांच्या पादुका राज्यात व परराज्यात नेण्यास दंग आहे. पादुका बाहेरगावी नेण्यास आमचा विरोध नाही. परंतु पादुकांचा बाहेरगावी दौरा होत असताना शिर्डीत भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे का? याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. याउलट साईबाबांच्या पादुका शिर्डीतील लेंडी बागेत साईभक्तांना दर्शनासाठी ठेवल्या तर भाविकांना नक्कीच समाधान मिळेल. पादुकांचा बाहेरगावी दौरा हा भक्तांच्या सोयीसाठी नसून तर संस्थान प्रशासनाच्या काही अधिकारी व कर्मचार्यांच्या सोयीसाठी असल्याचा दिसून येतो.
– प्रमोद गोंदकर (साईभक्त-शिर्डी)




