शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
विजयादशमी व साईबाबा पुण्यतिथी निमित्त शनिवारी साईनगरीत लाखो साई भक्तांनी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. देशभरात विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. शिर्डीत या उत्सवाला वेगळे महत्व आहे. या दिवशी साईबाबांचे महानिर्वाण झाल्याने या दिवशी बाबांची पुण्यतिथी साजरी केली जाते. साई संस्थानद्वारे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची परंपरा असून या उत्सवाचे 106 वे वर्ष आहे. शुक्रवारपासून सुरु झालेला हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. विजयादशमी हा उत्सवाचा मुख्य दिवस होता. त्यामुळे शिर्डीत देश विदेशातील लाखो भाविक, पंचक्रोशीतील भाविकांनी समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात एकच गर्दी केली होती.
शनिवारी मुख्य दिवशी पहाटे बाबांचे मंगलस्नान व काकड आरतीने उस्तावाची सुरुवात झाली त्यानंतर बाबांना वेगवेगळे सोन्याचे अलंकार, आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला. त्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर आरती झाल्यावर बाबांचा पवित्र ग्रंथ साईसच्चरित्र, पोथी, फोटो यांची शोभयात्रा काढण्यात आली. यावेळी साई संस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी संदिपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा पोलीस अधिकारी रोहिदास माळी तसेच ग्रामस्थ या मिरवाणुकीत सहभागी झाले होते. त्यानंतर सकाळी दहा वाजता परंपरेनुसार ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत भिक्षा झोळीचा कार्यक्रम पार पडला. दुपारी बाबांचा आराधना विधी संपन्न झाल्यावर दुपारी मध्यान आरती पार पडली.
या उत्सवात देणगीदाराच्या माध्यमातून देश विदेशातील विविध फुलांनी मंदिर व परिसरात केलेली सजावट, तिरुपती बालाजीची भव्य अशी मूर्ती प्रवेशद्वारावर उभा केलेला देखावा व विद्युत रोषणाई हे भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरले. विशेष म्हणजे लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या सुविधेसाठी साई संस्थांनने विविध ठिकाणी मंडप, पाणी, झोपण्याची सुविधा, प्रथमोपचार केंद्र, प्रसाद लाडू विक्री केंद्र, प्रसादालयात मोफत मिष्ठान्न सुविधा संस्थान प्रशासनाने निर्माण केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रत्येक भाविकांचे सुरक्षित व समाधानाने साई दर्शन होण्याकरिता अतिरिक्त पोलीस फौजफाटा व संस्थान सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. संस्थानचे हे चोख नियोजन पाहून अनेक भाविकांनी प्रशासनाला धन्यवाद दिले. संध्याकाळी बाबांच्या प्रतिमेची सुवर्ण रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. भाविकांची दर्शनाची गैरसोय होऊ नये या म्हणून साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले होते.
पूर्ण दिवसभरात शिर्डीमध्ये भाविकांची दर्शनासाठी झालेली गर्दी व भाविकांच्या मुखातून निघणार्या साई नामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली होती. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या उस्तावात याच देही हाच डोळा या युक्तिवादाप्रमाणे अनेक भाविकांनी हे क्षण आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करून घेताना बघायला मिळाले. रविवार उत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने मंदिरात काल्याचे कीर्तनचे आयोजन केले जाते व त्यानंतर मंदिरात दहीहंडी फोडून या विजयादशमी व साईबाबा पुण्यतिथी उस्तावाची सांगता होते. ही परंपरा शंभर वर्षांपासून आजही अबाधित आहे.
चप्पल व मोबाईल स्टॅन्ड, पार्किंग यांच्या अपुर्या सुविधेमुळे अनेक भाविकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. तामिळनाडू राज्यातील धर्मपुरी येथील देणगीदार साईभक्त जे. पी. बाल सुब्रमण्यम यांच्या 1 कोटीच्या देणगीतून साईबाबा हॉस्पिटल येथे बसविलेल्या 6 व्हेंटिलिटर मशिनचा शनिवारी पुण्यतिथी उत्सवानिमित्त लोकअर्पण करण्यात आले.