शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा संस्थानंच्या वतीने आयोजित 108 व्या साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला सोमवारी शिर्डीत अत्यंत मंगलमय वातावरणात व धार्मिक उत्साहात सुरुवात झाली. उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5:15 वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर, पहाटे 5:45 वाजता साईबाबांच्या प्रतिमेची व पवित्र साईसच्चरित्र ग्रंथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पोथी, तर प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले व मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात यांनी साईबाबांची प्रतिमा हातात घेऊन सहभाग घेतला.
मिरवणूक द्वारकामाईत पोहोचल्यानंतर साईसच्चरित्र ग्रंथाच्या अखंड पारायणास प्रारंभ झाला.
यात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम, प्रशासकीय अधिकारी अविनाश कुलकर्णी यांनी द्वितीय, प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांनी तृतीय, साईनाथ रुग्णालय वैद्यकीय संचालक डॉ. मैथिली पितांबरे यांनी चौथ्या, तर प्रकाशने अधीक्षक सुनिता शिंदे यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले. सकाळी 7:00 वाजता समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्निक श्रींची पाद्यपूजा केली. दिवसभरात मध्यान्ह आरती, अश्विनी सरदेशमुख यांची स्वरांजली संगीत सेवा, कोल्हापूरच्या राधिका गोपालकृष्ण कालेकर यांचे कीर्तन, धुपारती, तसेच बोरिवलीचे मधुसुदन भुवड यांचा साईराम संगीत संध्या कार्यक्रम आणि रात्री पालखीची सवाद्य मिरवणूक व शेजारती पार पडत असून, अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे. उत्सवानिमित्त मुंबई-शिर्डी साई द्वारकामाई मंडळाची आकर्षक विद्युत रोषणाई, श्री साईद्वारकाधीश देखावा आणि गुजरातच्या दानशूर साईभक्त श्रीमती ममता सतिष कपिलेश्वरकर यांच्या देणगीतून केलेली फुलांची पुष्परोषणाई शिर्डीत येणार्या भक्तांचे विशेष आकर्षण ठरली आहे.
आज मंगळवार, 20 ऑक्टोबर रोजी उत्सवाचा मुख्य दिन असून, या दिवशी काकड आरती, अखंड पारायण समाप्ती, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, ध्वजपूजन यांसारखे धार्मिक कार्यक्रम पार पडतील. विशेष म्हणजे, श्रींच्या समाधी मंदिरावरील सुवर्ण कलसाला 74 वर्षे पूर्ण होऊन 75 वे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असल्यानिमित्त उद्या सकाळी 7:30 वाजता सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर भिक्षा झोळी कार्यक्रम, राधिका गोपालकृष्ण कालेकर यांचे कीर्तन, आराधना विधी, मध्यान्ह आरती, तसेच श्री गौतम अरोरा (दिल्ली), रोहित दुग्गल (श्रीरामपूर) व राम शंकर (मुंबई) यांचे साईभजन कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन, रात्री रथाची मिरवणूक व कलाकार हजेरी कार्यक्रम पार पडेल. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर साईभक्तांच्या दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्याने दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री 10:00 वाजताची शेजारती आणि दिनांक 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:15 वाजताची काकड आरती होणार नाही, याची भाविकांनी नोंद घ्यावी.




