शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा संस्थानच्यावतीने (Sai Baba Sansthan) 9 ते 11 जुलै या काळात पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात (Guru Purnima Festival) भाविकांनी साई चरणी भरभरून गुरुदक्षिणा (Donation) अर्पण करत तब्बल 6 कोटी 31 लाखांहून अधिक रकमेची देणगी दिली. या उत्सवात देशभरातून आलेल्या तीन लाखांहून अधिक साईभक्तांनी समाधी मंदिरात साईंचे दर्शन घेतले.
सीईओ गोरक्ष गाडीलकर (CEO Goraksh Gadilkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उत्सव काळात विविध स्रोतांतून मिळालेली देणगी 6 कोटी 31 लाख 31 हजार 362 इतकी आहे. यात दक्षिणा पेटीतील रोख स्वरूपात 1 कोटी 88 लाख, देणगी काउंटरवरून 1 कोटी 17 लाख, ऑनलाईन, चेक-डीडी, मनीऑर्डर, कार्ड आणि युपीआयमधून 2 कोटी 5 लाखांची देणगी समाविष्ट आहे. तसेच भाविकांनी (Devotee) 668 ग्रॅम सोनं (रु. 57.87 लाख) आणि सुमारे 6,800 ग्रॅम चांदी (रु. 5.85 लाख) साई चरणी अर्पण केली. याशिवाय, पीआरओ सशुल्क दर्शन पासांद्वारे 55 लाख 88 हजारांची रक्कम जमा झाली.
उत्सव काळात सुमारे 3 लाखांहून अधिक भक्तांनी समाधी मंदिरात साईदर्शनाचा (Sai Temple Sai Darshan) लाभ घेतला. संस्थानच्या साई प्रसादालयात 1 लाख 83 हजारांहून अधिक भाविकांनी प्रसाद भोजन केले, तर दर्शन रांगेत 1 लाख 77 हजारांहून अधिक भाविकांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमा उत्सवात लाडू प्रसादाच्या विक्रीतून 64 लाख रुपयांची उत्पन्न मिळाले. हजारो साईभक्तांनी साईप्रसाद निवास, साईभक्त निवास, द्वारावती, साईआश्रम, साईधर्मशाळा यासह मंडपांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या अतिरिक्त निवास व्यवस्थांचा लाभ घेतला.
तसेच देशभरातून आलेल्या विविध पालख्यांतील पदयात्री साईभक्तांनाही साई धर्मशाळेत निवासाची सुविधा दिली गेली. सीईओ गाडीलकर यांनी सांगितले की, या देणगीचा उपयोग संस्थानच्या प्रसादालय, रुग्णालये, शैक्षणिक संकुल तसेच साईभक्तांसाठी विविध सेवा-सुविधा विकसित करण्यासाठी करण्यात येतो.




