Saturday, November 14, 2026
HomeनगरShirdi : साईबाबा संस्थानच्या पादुका दौर्‍यामुळे शिर्डीत भाविकांची संख्या घटली

Shirdi : साईबाबा संस्थानच्या पादुका दौर्‍यामुळे शिर्डीत भाविकांची संख्या घटली

शिर्डीच्या अर्थकारणावर परिणाम || व्यावसायिक, शेतकरी व हॉटेल व्यावसायिक अडचणीत

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थान प्रशासन शिर्डीत येणार्‍या भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याऐवजी साईबाबांच्या पादुका विविध राज्यांत आणि देशांत घेऊन जाण्यातच मग्न आहे. संस्थानच्या या धोरणामुळे विविध राज्यांतून शिर्डीत येणार्‍या भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली असून, याचा थेट आणि गंभीर परिणाम शिर्डीच्या अर्थकारणावर होत आहे. त्यामुळे साईबाबांच्या पादुका शिर्डीबाहेर न नेता त्या साईनगरीतच कायमस्वरूपी दर्शनासाठी ठेवाव्यात, अशी जोरदार मागणी साईसेवक अमृत गायके यांनी केली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर भूमिका मांडताना अमृत गायके म्हणाले, साईबाबा हे जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. साईसमाधीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भक्त शिर्डीत येतात. या भक्तांच्या आगमनामुळे शिर्डी शहरासह परिसरातील अनेक गावांमधील कुटुंबे, छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेल, लॉजिंग व्यावसायिक आणि फुलशेती करणारे शेतकरी यांचे अर्थकारण चालते. कोरोनाच्या संकटानंतर आधीच शिर्डीतील स्थानिक अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे. अशा स्थितीत भाविकांची संख्या वाढेल अशा उपाययोजना करणे गरजेचे असताना, संस्थान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक व्यावसायिक आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

भाविक श्रद्धेने वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे दान संस्थानला देतात. त्यामुळे संस्थानने भाविकांच्या सोयी-सुविधांवर व दर्शनाची प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देणे आवश्यक आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि त्यांच्या मर्जीतील काही कर्मचारी साईबाबांच्या पादुका विविध राज्यांत घेऊन जाण्यात व्यस्त आहेत. आपल्याच परिसरात पादुकांचे दर्शन मिळत असल्याने दिल्ली, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांतील भक्तांनी बाबांच्या पादुका आमच्याकडेच येतात, मग शिर्डीत कशाला जायचे? अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामुळे भाविक शिर्डीत येण्याचे प्रमाण घटले आहे.

गायके यांनी पुढे असाही सवाल उपस्थित केला की, पादुकांच्या नावाखाली संस्थानचे अधिकारी व कर्मचारी ठराविक भक्तांकडेच या पादुका का घेऊन जातात? यामागचे गूढ काय आहे? मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शिर्डीत थांबून प्रशासकीय कामकाज व भाविकांच्या सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे असताना, ते स्वतः दौर्‍यांवर का जात आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिर्डीतील व्यावसायिक, शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन संस्थान प्रशासनाने साईबाबांच्या पादुका शिर्डीबाहेर नेणे तात्काळ थांबवावे आणि त्या साईनगरीतच भाविकांच्या दर्शनासाठी कायमस्वरूपी ठेवाव्यात, अशी ठाम मागणी अमृत गायके यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : नाशिकचा श्वास गुदमरतोय…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. पण अलीकडच्या काही वर्षांत या सणाचे स्वरूप बदलले आहे....