Wednesday, January 7, 2026
HomeनगरShirdi : श्रद्धेचा प्रसाद महागला !

Shirdi : श्रद्धेचा प्रसाद महागला !

साईबाबा संस्थान म्हणते, ‘तोटा कमी करतोय!’

शिर्डी |Shirdi

साईबाबांच्या गोड बुंदी लाडू प्रसादाचा भाव थेट 50 टक्क्यांनी वाढवून संस्थानने भाविकांच्या श्रद्धेला महागाईची फोडणी दिली आहे. पूर्वी 20 रुपयांना मिळणारे दोन लाडूंचे पाकीट आता तीस रुपयांच्या ‘महाप्रसादा’त रूपांतरित झाले आहे. लाडू दोनच आहेत, पण किंमत मात्र दहा रुपयांनी जास्त आहे. हे संस्थानचे नवे ‘अर्थशास्त्र’ अनेकांच्या पचनी पडलेले नाही. संस्थानच्या या ‘गोड’ निर्णयाची चव मात्र कडवट ठरत आहे.

- Advertisement -

हा साई संस्थानचा भक्तांवर स्पिरिच्युअल टॅरिफ आहे की काय आणि त्यातूनच लाडू प्रसादावर 50 टक्के श्रद्धा शुल्क लागू झाले की काय, असा मिश्कील सवाल भाविक उपस्थित करत आहेत. करोडो रुपयांच्या देणग्यांवर चालणार्‍या आणि मोफत भोजनालय चालवणार्‍या संस्थानला अचानक प्रसादातील तोटा दिसू लागला, हे विशेष आहे. संस्थानच्या मतानुसार, मोफत वाटल्या जाणार्‍या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या उदात्त हेतूने ही दरवाढ केली आहे. पण भाविकांचा साधा सवाल आहे की, जो प्रसाद श्रद्धेने घरी नेला जातो, नातेवाईकांना वाटला जातो आणि ज्यातून बाबांच्या नावाची गोडी सर्वदूर पसरते, भाविकांच्या देणग्यांवर चालणार्‍या विश्वस्त संस्थेने असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून श्रद्धेच्या प्रतीकातूनच तोटा भरून काढावा का, असा थेट सवाल भाविक करत आहेत.

YouTube video player

विशेष म्हणजे, गोरगरिबांना परवडणारे दहा रुपयांचे एक लाडू पाकीट (ज्याची वार्षिक विक्री दीड कोटींच्या घरात होती) आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे पंचवीस रुपयांचे तीन लाडूंचे पाकीट बंद करून संस्थानने केवळ एकच प्रीमियम पर्याय ठेवला आहे. हा लाडू म्हणजे केवळ मिठाई नाही, तर घरी परतणार्‍या प्रत्येक भक्तासाठी बाबांच्या आशीर्वादाची ठेव असते. त्या श्रद्धेच्या प्रतीकाचे बाजारीकरण करणे कितपत योग्य आहे ? एकीकडे मोफत भोजनाचा आणि माफक दरातील चहा, कॉफी, दूध, नाश्त्याचा कौतुकास्पद उपक्रम आहे आणि दुसरीकडे प्रसादातून हिशोब जुळवण्याची कसरत आहे, हे गणित काही भाविकांना कळेनासे झाले आहे. आता बाबांच्या दर्शनानंतर प्रसादाची गोडी भाविकांच्या खिशाला परवडणार का, हाच खरा प्रश्न आहे.

तुपाचे दर वाढले आहेत. त्यामुळे खर्च वाढणार आहे. लाडू पाकीट विक्रीतून जो थोडाफार नफा मिळेल, त्यातून दर्शनानंतर दिल्या जाणार्‍या मोफत बुंदी प्रसादाची थोडीशी तुट कमी होण्यास मदत होईल.
गोरक्ष गाडीलकर, सीईओ, साईबाबा संस्थान

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...