Tuesday, October 22, 2024
Homeनगरसाई मंदिर सीआयएसएफ सुरक्षा लागू करण्यासंदर्भात समितीची बैठक

साई मंदिर सीआयएसएफ सुरक्षा लागू करण्यासंदर्भात समितीची बैठक

शिर्डी ग्रामस्थांचा सीआयएसएफ सुरक्षेला विरोध कायम

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी साईबाबा मंदिरामध्ये सीआयएसएफ ही सुरक्षा व्यवस्था असावी की नको याबाबत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठाने केलेल्या आदेशाप्रमाणे गठीत केलेल्या कमिटीची बैठक शनिवारी आयोजित केली होती. बैठकीत उपस्थित असलेल्या कमिटीच्या सदस्यांची ग्रामस्थांनी भेट घेऊन सीआयएसएफ सुरक्षा नियुक्त करू नये याबाबत निवेदन देऊन सीआयएसएफ नियुक्ती केल्यानंतर साईं दर्शनासाठी येणार्‍या साईभक्तांवर काय परिणाम होऊ शकतो याबाबत ग्रामस्थांंनी आपली बाजू मांडत या प्रश्नाला विरोध दर्शविला.

- Advertisement -

शनिवारी साई संस्थान येथे सीआयएसएफची बैठक होणार असल्याची माहिती शिर्डीतील ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी बैठकीच्या ठिकाणी जाऊन बैठकीसाठी उपस्थित असलेले साई संस्थानचे अध्यक्ष प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे व इतर कमिटीत असलेल्या सदस्यांची भेट घेऊन सीआयएसएफ सुरक्षा नको याबाबत ग्रामस्थांनी निवेदन देऊन या प्रश्नाला विरोध दर्शवला.

याबाबत ग्रामस्थांनी कमिटीबरोबर चर्चा करताना सांगितले, महाराष्ट्रातील कोणत्याही देवस्थानावर सीआयएसएफ सुरक्षा यंत्रणा नसताना केवळ शिर्डीसाठीच अट्टहास का? या सुरक्षा व्यवस्थेमुळे साईभक्तांसह ग्रामस्थांची देखील कुचंबणा होऊ शकते. त्याचा परिणाम साई संस्थानला मिळणार्‍या देणगीवर देखील होऊ शकतो. त्यामुळे सीआयएसएफ सुरक्षा यंत्रणेवर होणारा कोट्यावधी रुपये खर्चाचा आर्थिक ताण साई संस्थानवर पडणार आहे. साई संस्थानचे हॉस्पिटल, भोजनालय, दर्शन व्यवस्था, भक्त निवास आदी ठिकाणी अनेक त्रुटी असताना अशा प्रकारचा खर्च साईबाबा संस्थानला परवडणारा नाही.
साईबाबा संस्थान मधीलच सुरक्षा अधिकार्‍यांना व सुरक्षा रक्षकांना विशेष ट्रेनिंग देऊन देखील हा प्रश्न मार्गी लागू शकतो अशी बाजू ग्रामस्थांनी यावेळी बैठकीत मांडली.

याबाबत कमिटीतील सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 2028 मध्ये औरंगाबाद खंडपीठात या प्रश्नाबाबत एक जनहित याचिका दखल करण्यात आली होती. सीआयएसएफ सुरक्षा तैनात करावी की नाही याबाबत न्यायालयाने सात जणांची कमिटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशाचे पालन करत शासनाने सात जणांची कमिटी स्थापन केली आहे. ही कमिटी साई मंदिरात व मंदिर परिसरात कोणकोणत्या ठिकाणी सीआयएसएफ सुरक्षा आवश्यक आहे याचा अहवाल तयार करणार असून तो नोव्हेंबर 24 पर्यंत सादर करणार आहे. त्याच दृष्टीने शनिवारी या कमिटीने बैठक आयोजित केली असल्याचे समजते.

समितीच्या आधारावर डिसेंबर महिन्यात सुनावणी होऊन निर्णय होणार आहे. परंतू पहिल्याच बैठकीत ग्रामस्थांनी साई मंदिराला सीआयएसएफ सुरक्षा नको, असे निवेदन देऊन या प्रश्नाला विरोध केला. याबाबत कमिटी काय निर्णय घेते याची उत्कंठा ग्रामस्थांना लागली आहे. शनिवारी ग्रामस्थांच्या वतीने माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, कमालाकर कोते, रमेश गोंदकर, विजय जगताप, अमृत गायके, सुधाकर शिंदे, निलेश कोते, शिवाजी गोंदकर, प्रमोद गोंदकर, दिपक वारुळे, विकास गोंदकर, सुजित गोंदकर, तानाजी गोंदकर, महेश गोंदकर आदी ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेऊन सी आय एस एफ सुरक्षेला विरोध केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या