शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबांच्या समाधीपर्यंत हार, फुले गेली पाहिजेत अशी देशातील संपूर्ण साईभक्तांच्या मनात आस्था होती. साईभक्तांच्या मनातील श्रद्धा व त्यांच्या प्रार्थनेने हार, फुले पुन्हा साई समाधी मंदिरात चालू झाले. याचा मला मनस्वी आनंद आहे. तालुक्यातील सर्वसामान्य फूल उत्पादक शेतकर्यांचा प्रपंच पूर्णपणे यावर अवलंबून होता. आज त्यांच्यासाठी समाधानकारक दिवस राहील आणि साईबाबाबांच्या आशीर्वादाने हार, फुले कायम चालू राहावे, अशी साईचरणी प्रार्थना असल्याची स्पष्टोक्ती डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
साईबाबा समाधी मंदिरात फुले, हार व प्रसाद नेण्यास गुरुवारी सुरूवात झाली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्याहस्ते एक नंबर प्रवेशद्वार येथे साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या फुले, हार व प्रसाद विक्री स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनतर त्यांनी साईबाबा समाधीस फुलहार अर्पण केले. याप्रसंगी प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, कैलासबापू कोते, अभय शेळके, सुजित गोंदकर, साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन, मंदीर विभागप्रमुख विष्णू थोरात आदींसह शिर्डी ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2020 मध्ये करोना महामारीच्या काळात साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात होते. तेव्हा मंदिरात फुले-हार-प्रसाद नेण्यासही बंदी घालण्यात आली होती. करोना महामारीची तीव्रता कमी झाल्यावर 2021 मध्ये साईबाबा समाधी दर्शन सर्व सामान्यांसाठी खुले झाले होते. मात्र फुले, हार, प्रसाद विक्रीवरील बंदी कायम होती. त्यानंतर शिर्डी व परिसरातील फुले उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांकडून बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी होत होती. शेतकर्यांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती स्थापन केली होती.
या समितीने कर्मचारी पतपेढीच्या माध्यमातून रास्त दरात फुले, हार व प्रसाद विक्रीस व मंदिरात नेण्यास हरकत नसल्याचा अहवाल सादर केला होता. दरम्यानच्या काळात शिर्डी परिसरातील फूल उत्पादक शेतकर्यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर 14 नोव्हेंबर 2024 रोजी अंतिम निर्णय येऊन मंदिरातील फुले-हार-प्रसाद नेण्याची बंदी उठविण्यात आली होती. या निर्णयामुळे तालुक्यातील अस्तगाव, नांदुर्खी, कनकुरी, डोर्हाळे, राहाता, निमगाव, निघोज, कोर्हाळे, वाकडी तसेच शिर्डी परिसरातील फूल उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
‘योगायोग’ जुळून आला!
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काल दि. 12 डिसेंबरपासून साईबाबा समाधी मंदिरापर्यंत प्रत्यक्ष फुले-हार-प्रसाद नेण्यास सुरूवात झाली आहे. हा दिवस गुरुवार असल्या कारणाने अनेक गोष्टी योगायोगाने जुळून आल्या. 12/12/24 असा हा दिवस आपोआपचं घडून आला असून फुलांच्या शेतीवर प्रपंच अवलंबून असलेल्या शिर्डी व परिसरातील शेतकर्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.
पहिल्या दिवशी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्यावतीने गेट नंबर 1, साईधाम इमारत व अद्ययावत दर्शन रांगेसमोर असे तीन स्टॉल लावण्यात आले आहेत तर हजारो किलो झेंडू, गुलाब आणि सब्जाची खरेदी करण्यात आली आहे.