Friday, May 17, 2024
Homeनगरयापुढे सशुल्क पाससाठी साईभक्तांना आधार व मोबाईल नंबर बंधनकारक

यापुढे सशुल्क पाससाठी साईभक्तांना आधार व मोबाईल नंबर बंधनकारक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साई संस्थानने नवीन दर्शन पासेस पॉलिसी, डोनेशन पॉलिसी, रक्तदान पॉलिसी, साईमंदिर निर्माण पॉलिसी, देशव्यापी मंदिर असोसिएशनची स्थापना आदी घोषणा केल्या आहेत. या सर्व योजनांबाबत अंतीम निर्णय घेण्यापूर्वी भाविक व ग्रामस्थांकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत. यासंदर्भात संस्थानचे सीईओ पी. शिवा शंकर यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत.ही माहिती दिली.

- Advertisement -

साईमंदिर परिसरात भाविकांकडून रक्तदान केले जाते. यापुढे दानात मिळालेले रक्त रूग्णांना मोफत देण्यात येणार आहे. येथे काही बाहेरील रक्तपेढ्याही रक्तसंकलन करतात. त्यांनाही हे रक्त मोफतच द्यावे लागणार आहे. याबाबत संस्थानकडून संबधित रूग्णांशी संपर्क करून खातरजमा करण्यात येणार आहे. या रक्त पिशव्यांवर संस्थानचा टॅग असेल व नॉट फॉर सेल लिहीलेले असेल.

काल एका माजी नगरसेवकाने भाविकांना पास विकण्याच्या पार्श्वभुमीवर संस्थानने पोलीसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे पोलीस मंदिर परिसरात फिरणार्‍या व भाविकांची दिशाभुल करणार्‍या एजंटांचा शोध घेवून कारवाई करणार आहेत. वारंवार कुणावर कारवाई झाली तर त्याच्या हद्दपारीसाठी जिल्हाधिकारी व पोलीसांना संस्थानकडून पत्र दिले जाणार आहे.

साईंच्या शिकवणुकीच्या प्रचार प्रसारासाठी साईसंस्थानने देशभर साई मंदिर उभारणीत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साईसंस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारणार आणि चालवणार आहे. याशिवाय तेथे रूग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणाजया मंदिरांनाही पन्नास लाखांपर्यंत मदत करण्याचा संस्थान विचार करत आहे.

यापुढे भाविक ज्या प्रमाणात देणगी देतील त्याप्रमाणात त्यांना वर्षभर ठराविक आरत्या व दर्शनाची सुविधा संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संस्थान युनीक आयडी कार्ड बनणार आहे. यापूर्वी साईसमाधीवर शॉल टाकण्यासाठी सोडत पद्धत अवलंबण्यात येत होती. आता यातही मोठ्या देणगीदारांना ही संधी उपलब्ध करून देण्याबाबत संस्थान विचार करत आहे. याशिवाय देशभरातील साईमंदिराची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही साईसंस्थानचा विचार सुरू आहे.

आरती व दर्शन पासेस मध्ये होणारा गैरवापर रोखण्यासाठी साईंच्या आरतीचे सशुल्क पासेससाठी शिफारस करताना यापुढे सर्व भाविकांचे आधार कार्ड व मोबाईल नंबर द्यावे लागणार आहेत. पासेस कन्फरमेशनबाबत संबधित भाविकाच्या मोबाईलवर मेसेज पाठवला जाणार आहे. येत्या शुक्रवार पासुन प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. टोकन नंबरसाठी बुकींग केल्यावर भाविकांना मेसेज पाठवला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या