शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साई संस्थानच्या भोजनालयात भाविकांशिवाय इतरांना मोफत जेवण सशुल्क केल्यानंतर पहिल्या दिवशी मोफत भोजन प्रसादाची दर्शन रांगेत, भक्तनिवीसे व रूग्णालयातील रुग्ण आदींना 35 हजार भाविकांना टोकन तिकीटे दिली. त्यापैकी 16 हजार 101 भाविकांनी मोफत प्रसादाचा लाभ घेतला. तर सशुल्क पासेद्वारे 2901 भाविकांना प्रसाद भोजनाचा लाभ दिला. यामुळे मोठ्या प्रमाणावर मोफत प्रसाद घेणार्यांची संख्या घटली आहे.
नशाखोर व व्यसनी तसेच भिकार्यांचा देणगीदार साईभक्त भाविकांना त्रास होवू नये यासाठी साईबाबा संस्थानने प्रसादालयातील प्रसाद भोजनाची नियमावलीत बदल करून फक्त दर्शनसाठी आलेले भाविक, भक्तनिवासात राहिलेले भाविक आणि रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना मोफत प्रसाद भोजन देण्यासंबधी निर्णय घेतला. या निर्णयाची काल (गुरूवार) पासून अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी दर्शन रांगेच भाविकांना मोफत भोजन प्रसादाची कुपन-टोकन देण्यात आली तर भक्तनिवासातील भाविकांना व रूग्णालयातील रूग्णांना मोफत टोकन कुपन देण्यात आली. साईसंस्थानच्या या निर्णयाचे भाविकांनी व शिर्डी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
शिर्डीतील भिकारी, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मोफत जेवण मिळत असल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा भाविकांना मोठा त्रास होत होता. प्रसादालयात व्यसनी आणि नशेखोरांचाही सामान्य भाविकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याच्या असंख्य तक्रारी साई संस्थानकडे भाविकांनी केल्या होत्या. या पाश्वभूमीवर प्रसादालयातील भोजन प्रसादाची नियमावली बदलून भाविकांना मोफत प्रसाद भोजनाचे टोकन दर्शनरांगेतच देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे देशातील भाविकांनी व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.