Tuesday, October 22, 2024
Homeनगरमंदिरातून साईमूर्ती हटविणे संस्कृतीशी विसंगत- ना. विखे

मंदिरातून साईमूर्ती हटविणे संस्कृतीशी विसंगत- ना. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

वाराणसीतील मंदिरांत असलेल्या साईबाबांच्या मूर्ती हटवण्याच्या मुद्द्यावरून बुधवारी शिर्डीत संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. साईबाबांच्या मूर्ती मंदिरातून हटवणे संस्कृतीशी विसंगत असल्याची भावना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. यासंदर्भात आपण सकाळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून त्यांना तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. याशिवाय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणार आहोत. त्यांच्याशी बोलल्यानंतर हा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

बुधवारी सकाळी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनीही महसूलमंत्री विखे पाटील यांना याप्रकरणी शासनाने हस्तक्षेप करून अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्याची विनंती केली. आपल्या देशाला संतांची थोर परंपरा आहे. श्रीसाईबाबा सर्वसमावेशक संत होते. त्यांनी कधीही धर्म, पंथ, जात यांच्याआधारे भेदभाव केला नाही. साईबाबांनी समाजातील लोकांना प्रेम, करूणा, मानवता व समतेचा संदेश दिला. या माध्यमातून आजही देश-विदेशातील लाखो भाविकांच्या हदयात ते सदैव असल्याच्या भावना भाविकांनी व्यक्त केल्या. माजी नगराध्यक्ष कैलास कोते म्हणाले, शिर्डीच्या साईबाबांची कितीही बदनामी केली तरी साईभक्तांच्या श्रध्देवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्वधर्म समभाव हा साईंचा संदेशच आज जगासाठी महत्वाचा आहे.

माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप म्हणाले, विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी साईबाबांचे फोटो बाहेर काढले असले तरी करोडो लोकांच्या मनात साईंच्या अढळ स्थानाला कोणीही धक्का लावू शकणार नाही. साईभक्तांवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते म्हणाले, साईबाबांना धर्मावरून लक्ष्य करणे म्हणजे अज्ञानाचा कळस आहे. मानवतेसाठी काम करणारांना धर्म नसतो. विखारी आणि बुद्धीभ्रष्ट झालेल्या विकृतींनी समाजाला दुभंगण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले, भक्तांच्या भावना दुखावणारी कोणतीही कृती निंदनीय आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर म्हणाले, माणसाला परमेश्वराकडे घेऊन जाणारे संतच असतात. त्यामुळे संतांना देवत्व प्रदान करणारी आपली संस्कृती आहे़ अशा घटना निंदनीय आहेत. याचबरोबर शिर्डीत येणार्‍या साईभक्तांनी या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदविला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या