Tuesday, October 22, 2024
Homeनगरसाई मूर्ती हटविल्याने भाविक नाराज

साई मूर्ती हटविल्याने भाविक नाराज

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

वाराणसी येथे मंदिरांतून साईबाबांची मूर्ती हटविण्यावरून साईभक्तांत नाराजी पसरली असून अनेकांनी भावना दुखावल्याचे म्हटले आहे. दरम्यान, साईबाबांच्या मूर्ती मंदिरातून हटवणे संस्कृतीशी विसंगत असल्याची भावना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी स्वत: चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर साईबाबा हे राज्यघटनेला अपेक्षित देव असल्याची प्रतिक्रीया काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी या वादावर दिली आहे.

- Advertisement -

वाराणसीत सनातन सरंक्षण दलाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मंदिरातील साईबाबांचा फोटो आणि मूर्ती हटविल्या आहेत. 18 हून अधिक मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या. हिंदू धर्म शास्त्रात साईबाबांचा पुजाविधी नाही, त्यामुळे साईंची पूजा करू नये. अशी मागणी सनातन रक्षक दलाची आहे. यानंतर साईभक्तांमध्ये नाराजीचा स्वर तीव्र झाला आहे. शिर्डीत येणार्‍या साईभक्तांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. या संदर्भात पालकमंत्री विखे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांना तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती ना.विखे यांनी केली आहे. याशिवाय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्याशीही बोलणार आहोत. त्यांच्याशी बोलल्यानंतर हा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास ना.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिर्डीचे साईबाबा कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. साईदर्शनाने लोकांना आत्मिक शांती लाभते. साई मंदिरात धर्मनिरपेक्षता असून साईबाबा जाती धर्माच्या पलीकडचे देव असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. काही ठिकाणी मूर्ती हटवण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून हा धर्माचा अतिरेक आहे. काही लोकांना चातुवर्ण आणि मनुस्मृती पुन्हा आणायची आहे. साईबाबा म्हणजे राज्यघटनेला अपेक्षित देव आहेत. हिंदू असणे वेगळे आणि हिंदुत्ववादी असणे हे वेगळं आहे. देशाला पुन्हा अंधार युगाकडे नेण्याचा हा प्रयत्न चालला आहे, अशी टीका थोरात यांनी केली.
तत्पूर्वी बुधवारी सकाळी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी महसुलमंत्री विखे पाटील यांना याप्रकरणी शासनाने हस्तक्षेप करून अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्याची विनंती केली. आपल्या देशाला संताची थोर परंपरा आहे. श्रीसाईबाबा सर्वसमावेशक संत होते. त्यांनी कधीही धर्म, पंथ, जात यांच्या आधारे भेदभाव केला नाही. साईबाबांनी समाजातील लोकांना प्रेम, करूणा, मानवता व समतेचा संदेश दिला. या माध्यमातून आजही देश-विदेशातील लाखो भाविकांच्या हदयात ते सदैव असल्याच्या भावना भाविकांनी व्यक्त केल्या.

माजी नगराध्यक्ष कैलास कोते म्हणाले, शिर्डीच्या साईबाबांबाची कितीही बदनामी केली तरी साईभक्तांच्या श्रध्देवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्वधर्म समभाव हा साईंचा संदेशच आज जगासाठी महत्वाचा आहे. माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप म्हणाले, विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी साईबाबांचे फोटो बाहेर काढले असले तरी करोडो लोकांच्या मनात साईंच्या अढळ स्थानाला कोणीही धक्का लावू शकणार नाही. साईभक्तांवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते म्हणाले, साईबाबांना धर्मावरून लक्ष्य करणे म्हणजे अज्ञानाचा कळस आहे. मानवतेसाठी काम करणारांना धर्म नसतो. विखारी आणि बुद्धीभ्रष्ट झालेल्या विकृतींनी समाजाला दुभांगण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले, भक्तांच्या भावना दुखावणारी कोणतीही कृती निंदनीय आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होवू शकतो. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर म्हणाले, माणसाला परमेश्वराकडे घेऊन जाणारे संतच असतात. त्यामुळे संताना देवत्व प्रदान करणारी आपली संस्कृती आहे. अशा घटना निंदनीय आहेत. याचबरोबर शिर्डीत येणार्‍या साईभक्तांनीही या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदविला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या