Sunday, September 29, 2024
Homeनगरसाई समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण स्मृती अमृत महोत्सवाचे आज उद्घाटन

साई समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण स्मृती अमृत महोत्सवाचे आज उद्घाटन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण स्मृती अमृत महोत्सव पर्वाचे उद्घाटन आज रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता शिर्डी येथील शताब्दी मंडपात होणार असल्याची माहिती येथील पारनेरकर गुरु सेवा मंडळाने दिली.
साईबाबांच्या 34 व्या पुण्यतिथी निमित्त 29 सप्टेंबर 1952 रोजी पारनेर येथील संत, पूर्णवाद परिवाराचे प्रणेते डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कलश स्थापन करण्यात आला होता. या ऐतिहासिक घटनेचा दरवर्षी कलशारोहण स्मृती महोत्सव साजरा करण्यात येतो. हा स्मृती उत्सव अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. पूर्णवाद परिवाराचे प्रमुख विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रेरणेने अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणार्‍या अमृत पर्वाचा शुभारंभ रविवारी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.

- Advertisement -

पारनेर येथील पारनेरकर गुरु सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, साईस ंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. छत्रपती संभजीनगर जीवन कला मंडळाचे अध्यक्ष गणेश जहागीरदार हे स्वागताध्यक्ष असणार आहेत. यानिमित्त पूर्णवाद परिवारातर्फे अहमदनगर, बीड, छत्रपती संभजीनगर, पुणे, नाशिक अशा पाच जिल्ह्यातील पूर्णवाद परिवारातील उपासकांची श्रीरामपूर ते शिर्डी अशी पादुका पालखी निघणार आहे. ही पायी दिंडी श्रीरामपूर, वाकडी, गणेशनगर, एकरुखे, राहाता, शिर्डी अशी राहणार आहे. ही पायी दिंडी आज शनिवारी श्रीरामपूर येथून सकाळी निघेल आणि सायंकाळी शिर्डीत पोहोचणार आहे.

या दिंडीत 300 पेक्षा जास्त उपासक सहभागी होणार आहेत. यावेळी पारनेरकर महाराजांच्या चांदीच्या पादुकांचे पूजन होईल. त्यानंतर या पादुका साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहेत. त्यानंतर पूर्णवाद परिवारातर्फे शिर्डीतून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. साईसमाधी मंदिर ते डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर मंदिर गुरुस्थाननगर, विमानतळ रोड, शिर्डी अशी राहणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पारनेरकर गुरु सेवा मंडळाचे अध्यक्ष गुणेश पारनेरकर, कार्याध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर, साईबाबा समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय केदार, उपाध्यक्ष हनुमंत कुलकर्णी, कोषाध्यक्ष सुधीर गुलदगड, सचिव सुनील जोशी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शिर्डी येथील राजू मुठाळ, संजय मुठाळ, निलेश पुराणिक, हेरंब जोशी, सुनील जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या