शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा संस्थान मधील सर्व कामगारांच्या प्रश्नांबाबत शासन स्तरावर निर्णय होण्याच्या दृष्टीने आपला पाठपुरावा सातत्याने सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून ऑगष्ट महिन्याअखेर कामगारांच्या प्रश्नाबाबत निर्णय होईल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. शिर्डी येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आणि नगरपरिषद कामगारांच्या सोडविलेल्या प्रश्नांबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ना. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, सुधाकर शिंदे, नितीन कोते, विलास कोते यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना.विखे पाटील म्हणाले, शिर्डी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या नेहमीच मिळालेल्या पाठबळामुळे राज्यात काम करण्याची संधी मिळाली. ज्या विभागाचे मंत्रीपद आपल्याला मिळाले त्या माध्यमातून शिर्डी शहराच्या विकासाला पुढे घेवून जाण्यासाठीच आपला प्रयत्न राहील. शहराच्या विकासाला निधीची कमतरता कुठेही कमी पडू दिली नाही. शिर्डीत येणार्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून साईबाबांच्या जीवनावर ‘थिमपार्क’ उभारण्यासाठी आणि ‘लेझर शो’ करिता 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी ठरेल, असेही त्यांनी सांगितले. मागील अनेक दिवसांपासून शिर्डी संस्थानमधील कामगारांचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी कामगारांचा संघर्ष झाला. न्यायालयीन लढाया झाल्या.
परंतू आता शासन स्तरावर या प्रश्नाची तड लागावी म्हणून आपण पाठपुरावा केलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामगारांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आहेत. 598 कामगारांबरोबरच बाह्य यंत्रणेतून काम करणारे कामगार तसेच इतर व्यवस्थेमध्ये असणार्या सर्वच कामगारांना न्याय कसा मिळेल हा प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आला आहे. या महिन्याअखेर पर्यंत निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिर्डी आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या म्हणूनच शेती महामंडळाची 500 एकर जमीन औद्योगिक वसाहतीकरिता उपलब्ध करुन दिली. अनेक कंपन्या आता या परिसरात येण्यास इच्छुक आहेत. यापैकीच डिफेन्स क्लस्टरचा पहिला प्रकल्प येत असून याबाबत शासन स्तरावर कराराची प्रक्रीयाही पूर्ण होत आहे. या प्रकल्पात आपल्या परिसरातील दोन ते अडीच हजार युवकांना नोकरीची संधी मिळणार असल्याची माहिती ना. विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी नगरपरिषदेच्या कामगारांच्या वतीनेही मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली. या कामगारांच्या प्रश्नाबाबत केलेल्या सहकार्याबद्दल कामगारांनी त्यांचे आभारही मानले. यावेळी मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते नगरपरिषद कर्मचार्यांना आश्वासित प्रगती योजना लाभाचे धनादेश, सेवानिवृत्त कर्मचार्यांना रजावेतन व उत्पादीत लाभाचे धनादेश आणि कुटूंब निवृत्ती वेतन योजने अंतर्गत धनादेश सुपूर्त करण्यात आले. तसेच तीन सफाई कर्मचार्यांच्या वारसांना नियुक्ती पत्रही प्रदान करण्यात आले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि शिर्डी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार ना. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कृतज्ञता सोहळ्यात बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, कामगारांच्या संघटीत प्रयत्नांमुळे स्वच्छ आणि सुंदर शिर्डी ही प्रतिमा निर्माण होवू शकली. राज्य आणि देशपातळीवर नगरपरिषदेचा झालेला गौरव हे सर्व कामगारांचे श्रेय असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.