शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
भक्तांच्या श्रद्धेचे प्रतिक असलेल्या साईबाबा संस्थानच्या कारभारात झालेला मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्युत विभागातील तब्बल 80 लाख रुपयांचे वीज साहित्य खुलेआम चोरले गेले आणि या चोरीची जबाबदारी थेट 47 अधिकारी-कर्मचार्यांवर निश्चित झाली आहे. न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात अखेर या 47 संशयित चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संजय काळे यांनी दिलेल्या स्फोटक माहितीनुसार, 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2023 या सात वर्षांच्या काळात संस्थानच्या डेड स्टॉक विभागातून पद्धतशीरपणे माल गायब करण्यात आला. विशेष म्हणजे 30 कोटी 50 लाखांच्या डेड स्टॉकचा हिशेब तपासला असता, 77 लाख 13 हजार 923 रुपयांचे साहित्य गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यापूर्वी 23 मे 2022 रोजी केवळ 22 हजार 500 रुपयांच्या चोरीची एक जुजबी तक्रार दाखल करून या महाघोटाळ्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न झाला होता.
संस्थान अंतर्गत लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले की, ही सामूहिक चोरी आणि गैरव्यवहार असून, याची जबाबदारी 47 लोकांवर आहे. यातील 39 लोकांनी चोरीच्या पैशांची भरपाई म्हणून रक्कम संस्थानच्या खात्यात जमा केली आहे. म्हणजे चोरी झाल्याचे आणि त्यात सहभाग असल्याचे सिद्ध झाले. तरीही संस्थान व्यवस्थापनाने यावर अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखवली नाही. या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न झाल्याचे गंभीर मत प्रधान जिल्हा न्यायाधीशांनीही व्यक्त केले होते. ज्यात तत्कालीन प्र. लेखाधिकारी साहेबराव पांडुरंग लंके यांचा प्रमुख सहभाग असल्याचे नमूद आहे.
संस्थान प्रशासनाच्या या संदिग्ध भूमिकेमुळे फिर्यादी संजय काळे यांना थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घ्यावी लागली. क्रिमिनल रिट पिटीशन नंं. 791/2024 मध्ये न्यायालयाने संस्थानला धारेवर धरले आणि 15 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या कठोर आदेशानुसार, शिर्डी पोलिसांनी 17 ऑक्टोबर रोजी 47 चोरीबाज अधिकारी-कर्मचार्यांवर 379, 381, 408, 409 (अपहार), 465, 467 (बनावटगिरी) आणि 120-ब (षडयंत्र) यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये विद्युत पर्यवेक्षक नामदेव रामचंद्र जाधव, बाळासाहेब केशव सावंत, वसंत दामोधर गाडेकर, कै. बी. डी. खाडगीर तसेच साहेबराव पांडुरंग लंके (प्र. लेखाधिकारी अल्प विभाग), अशोक रंभाजी औटी (प्रशासकीय अधिकारी), रवि सतिष घुले (कार्यकारी अभियंता), रघुनाथ भागाजी आहेर (प्र. कार्यकारी अभियंता), संजय मधुकर जोरी (कार्यकारी अभियंता), विजय गणपतराव रोहमारे (उप कार्यकारी अभियंता), राजेंद्र सोपान जगताप (प्र. अभियंता), प्रकाश नाना अभंग (प्र. अभियंता), मदतणीस राहूल मदन इंगवले, सुनिल काशीनाथ धरम, एन. आर. शेख, दिपक शिवाजी तुरकणे, राजेंद्र मोहनराव बोठे, आऊटसोर्स कर्मचारी साईनाथ इनामके, महेश मुंढरे, स्वप्निल जोंधळे, विद्युत विभाग तारतंत्री प्रमोद शंकरराव चिने, किशोर एकनाथ महाले, उमाकांत तुपे, बाळू कृष्णाराव कुलकर्णी, अरुण गणपत जाधव, संजय बाळासाहेब बनसोडे, सागर रमेश जगताप, संजयकुमार एकनाथ हारणे, शरद बाबासाहेब मते, महेश मोढे, सागर खामकर, रामनाथ लक्ष्मण वाकचौरे, सोमनाथ साहेबराव पाचेरे, विक्रम सुरेश देवकर, सुभाष नामदेव लांडगे, महेश विठ्ठल गोंदकर, भानुदास दादा बावके, विलास भागूनाथ जेजूरकर, सागर ठोंबरे, गोरक्षनाथ आप्पा काळे, सुनिल पुंडलीक वाघ, विलास रघुनाथ भावसार, अनिल नामदेव वाणी, सर्जेराव मच्छिंद्र गोरे, पाराजी चांगदेव वाणी, साईनाथ परसराम आव्हाळे, योगेश रामचंद्र रोहम यांचा समावेश आहे.
आता या 47 आरोपींच्या मालमत्तेची कसून चौकशी होणार असून ही केवळ हिमनगाची टोकच आहे की संस्थेत आणखी मोठे अपहार झाले आहेत, याचा तपास पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे करत आहेत. संस्थेच्या इतर विभागात किती चोरी झाली? हा प्रश्न आता भक्तांच्या मनात तीव्रतेने उभा राहिला आहे.
संस्थानच्या विद्युत विभागात 2017 ते 2023 या कालावधीत सुमारे 51.62 लाख रुपयांच्या साहित्याची अनियमितता झाल्याचे शासनमान्य लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी 47 अधिकारी-कर्मचार्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. यामध्ये मृत 3 कर्मचार्यांकडील 13,961 रुपयांच्या वसुलीस समितीने सूट दिली आहे, तर उर्वरित 44 पैकी 39 अधिकारी-कर्मचार्यांनी आतापर्यंत 17.54 लाख रुपये संस्थानकडे जमा केले आहेत. विद्युत साहित्य चोरी प्रकरणी राहुल इंगवले यांना तर 21 मे 2022 रोजीच सेवेतून बडतर्फ केले आहे आणि त्यांच्या नावावरील 20.74 लाख रुपयांच्या रकमेबाबत गुन्हा दाखल आहे. उर्वरित 4 अधिकार्यांकडून 13.19 लाख रुपये वसूल होणे बाकी आहे. मात्र त्यांनी खंडपीठ, संभाजीनगर येथे रिट याचिका दाखल केली असून न्यायालयाने सक्तीची कारवाई नको, असा अंतरिम आदेश दिला आहे. शासन निर्णयानुसार, झालेल्या नुकसानीची रक्कम संबंधित व्यक्तींनी एका महिन्याच्या आत भरणा केल्यास, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसते.
– गोरक्ष गाडिलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी




