शिर्डी | Shirdi
संपूर्ण जगाला श्रद्धा व सबुरीची शिकवण देणारे साईबाबांनी त्यांच्या हयातीत अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रोगी रुग्णांना विविध प्रकारचे जडीबुटी तसेच उदी देऊन ठणठणीत केले. त्यामुळे ‘शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळतील अपाय सर्व त्याचे’ या साईबाबांच्या मूलभूत मंत्राप्रमाणे साईबाबांवर श्रद्धा असणारे विविध राज्यातून शेकडो रुग्ण साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याकरिता येतात परंतु या ठिकाणी रुग्णांना वेळेवर उपचार व योग्य प्रकारची वागणूक दिली जात नसल्याने अनेक रुग्णांनी याबाबत नाराजी व्यक्त करत संस्थान प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या सावळा-गोंधळावर लक्ष घालण्याची गरज असून मरगळ आलेल्या साईबाबा सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलला खर्या अर्थाने ‘बुस्टर डोस’ची गरज आहे अशी चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.
साईबाबा संस्थानने कोट्यावधी रुपये खर्चून शिर्डीत विविध राज्यातून तसेच परिसरातील येणार्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून तात्काळ उपचार तसेच शस्त्रक्रिया व विविध प्रकारच्या आजारावर निदान व्हावे म्हणून भव्य साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी केली. या ठिकाणी मेंदू, हृदय, पोट, कान, नाक, घसा, छाती व दंत अशा विविध प्रकारचे, हाडांच्या तसेच विविध प्रकारचे आजार संबंधी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करून एनजॉग्राफी, एन्जोप्लास्टी, हृदयाची बायपास शस्त्रक्रिया तसेच मेंदू, पोट, हृदयविकार संबंधी व इतर मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी महागडी मशिनरी उपलब्ध करून दिली आहे.
याखेरीज सिटीस्कॅन, एमआरआय व एक्स-रे मशीन उपलब्ध करून रुग्णांना 24 तास सेवा देण्यासाठी शेकडो कर्मचारी यांची नियुक्ती करून रुग्णांची हेळसांड होणार नाही यासाठी डायरेक्टर बोर्ड कमिटी स्थापन करून त्यांना हॉस्पिटलची जबाबदारी सोपविली आहे. म्हणजेच साईबाबा संस्थान वर्षाकाठी कोट्यावधी रुपये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी यांना वेतन देण्यासाठी खर्च करते. असे असताना देखील येथील काही डॉक्टर व कर्मचारी येणार्या रुग्णांना योग्य प्रकारची वागणूक तसेच वेळेवर उपचार देत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.
साईबाबा संस्थान प्रशासन या बाबींची दखल घेत नाही ही आश्चर्याची बाब आहे. हॉस्पिटलमध्ये नेमणूक केलेल्या बहुतेक डॉक्टरांचे स्वतःचे खासगी हॉस्पिटल असल्याने हे डॉक्टर्स रुग्णांना उपचार देण्यासाठी आपल्या गावी असलेल्या हॉस्पिटलमध्ये सकाळी रुग्णांना उपचार देण्यासाठी प्रथम प्राधान्य देतात. त्यानंतर दुपारनंतर वेळ मिळेल तसे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये येऊन घाईघाईने रुग्णांची तपासणी करून पुन्हा आपल्या खासगी हॉस्पिटलकडे परतण्यासाठी निघतात. त्यामुळे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना आपल्या आजाराचे निदान झाल्यानंतर यावर काय उपचार घ्यायचे किंवा शस्त्रक्रिया कधी करायची याबाबत डॉक्टरांचा अभिप्राय घेण्यासाठी डॉक्टर वेळ देत नाहीत किंवा अपघात झालेल्या रुग्णांना जेव्हा तात्काळ उपचाराची गरज असते त्यावेळी या ठिकाणी नेमणूक केलेले तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध राहत नाही अशी परिस्थिती अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना बघायला मिळते.
त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून अद्ययावत मशिनरी व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध करून देखील सुपर स्पेशलिटीमध्ये येणार्या रुग्णांना तात्काळ सेवा मिळत नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना नाईलाजास्तव नाशिक, पुणे किंवा इतरत्र हॉस्पिटलचा शोध घ्यावा लागतो. ही गंभीर बाब असून येथील काही डॉक्टर व कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना वेळेवर उपचार व योग्य प्रकारची वागणूक मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी साईबाबा संस्थान प्रशासनाकडे करून देखील संस्थान प्रशासन या गोष्टीची दखल घेत नाही. यामागचे कारण काय हे समजत नाही.
साईबाबांवर श्रद्धा असलेले शेकडो रुग्ण साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये आपल्याला योग्य प्रकारचे उपचार मिळेल व साईबाबांच्या आशीर्वादाने आपण लवकरच ठणठणीत घरी जाऊ ही भावना मनाशी बाळगून येतात. या ठिकाणी अल्पदरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रामुख्याने गरजू रुग्णच या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येतो. परंतु रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेला सावळा-गोंधळ कधी संपेल व हॉस्पिटलला पुन्हा एकदा नवसंजीवनी कशी देता येईल याकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे, अशी चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.
परिसरातील रुग्णांना अचानक काही त्रास झाला तर जवळचे सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेले रुग्णालय हे शिर्डीतील सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल असल्याने व आपल्याला तात्काळ उपचार मिळेल हा दृष्टिकोन ठेवून रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना घेऊन या ठिकाणी येतात. परंतु या ठिकाणी आल्यावर रुग्णांना तात्काळ उपचार देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होते. परिणामी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने बाहेरगावी दुसर्या हॉस्पिटलला जावे लागते. साई संस्थान प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन साई संस्थांमध्ये सुरू असलेल्या सावळा-गोंधळावर लक्ष देणे गरजेचे आहे.
– अमृत गायके, सामाजिक कार्यकर्ते शिर्डी.





