शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा संस्थान नवीन विश्वस्त मंडळ स्थापनेला वेग आला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ स्थापन होण्याची शक्यता आहे. 2027 मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ होणार असल्याने देश विदेशातील भाविकांची गर्दी होऊ शकते. त्या अनुषंगाने शिर्डीतील रस्ते, पाणी, भूमिगत गटार, पार्किंग, लाईट, निवासस्थाने यासारख्या महत्वपूर्ण सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पूर्वतयारी व आराखडा तयार केला आहे. परंतु त्यात शिर्डीचा समावेश नाही. यासाठी नवीन विश्वस्त मंडळ स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे साई संस्थान विश्वस्त मंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
सध्या संस्थानचा कारभार त्रिसदस्यीय कमिटी हाताळत आहे. मात्र त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याच्या मर्यादा आहे. त्यामुळे शिर्डीतील महत्वाची विकासकामे ठप्प आहेत. त्यामध्ये रिंगरोड, पार्किंग, गार्डन यासारखी आरक्षणे विकसित करताना जमिनीचे भूसंपादन महत्वाचे आहे. मात्र शिर्डी नगरपरिषदेकडे निधी नसल्याने ते साई संस्थानवर अवलंबून आहे. मात्र हे निर्णय विश्वस्त मंडळच घेऊ शकते. कारण भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षाची सत्ता असल्याने नवीन विश्वस्त मंडळात या पक्षातील 21 सदस्य राहतील. त्यामध्ये डॉक्टर, आर्किटेक्ट, वकील तसेच इतर क्षेत्रातील पदवीधर असे अनुभवी सदस्य असणे बंधनकारक आहे.
सात सदस्य जिल्ह्यातील रहिवासी असावेत असाही नियम असल्याने जिल्ह्यातील अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्वपूर्ण भुमिका असणार आहे. त्यामुळे विधी व न्याय खाते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आणि सक्षम नवीन विश्वस्त मंडळ स्थापन करतील हाच विश्वास भाविकांना आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून गुढघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक आता मुंबई वार्या करत आहेत.
साई संस्थानच्या माध्यमातून शिर्डी व परिसराचा अधिक गतिमान विकास होण्याकरिता शासन दरबारी राजकीय वजन व प्रशासनावर पकड तसेच विकासाचे व्हिजन असणारे डॉ. सुजय विखे पाटील यांना साई संस्थानचे अध्यक्ष होण्याची संधी दिली तर परिसराचा विकास होईल, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.