शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
श्री साईबाबा संस्थानला केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय चलनातील दान स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. यामुळे 2021 पासून बंद असलेली सुविधा पुन्हा सुरू झाली आहे. याशिवाय संस्थानच्या तिजोरीत पडून असलेले परकीय चलनही संस्थानला व्यवहारात आणता येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2021 मध्ये ऐन कोविड महामारीच्या काळात तांत्रिक बाबीवर साई संस्थानसह देशातील अनेक प्रमुख देवस्थानांचा परकीय चलन परवाना गोठवला होता. त्यामुळे साईसंस्थान मध्ये 31 डिसेंबर 2021 पासून परकीय चलन स्वीकारण्याची सुविधा बंद होती, तरीही भाविक दानपेटीत नोटा, चेक, व तत्सम देणगी स्वरुपात परकीय चलन टाकत होते. यामुळे संस्थांनकडे 2021 पासून आजवर जवळपास 20 कोटींचे परकीय चलन जमा झाले होते.
मात्र, हे चलन संस्थांनला व्यवहारात आणता येत नव्हते. 20 नोव्हेंबर 2023 पासून तर संस्थांनने परकीय चलन स्वीकारणेही बंद केले होते. तशा आशयाचे फलकही देणगी कक्षात व मंदिर परिसरात लावण्यात आले होते. साई संस्थांनचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या दिल्ली दरबारी केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने 2021 पासून 2026 पर्यन्त परकीय चलनाचा परवाना नूतनीकरण केला आहे. यामुळे संस्थानकडे यापूर्वी जमा झालेले परकीय चलनही वापरता येणार असल्याचे संस्थानच्या मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे व लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी यांनी सांगितले.