Tuesday, September 17, 2024
Homeनगरसाई मंदिरात भाविकांना जाण्यासाठी चारही प्रवेशद्वार खुले करावेत

साई मंदिरात भाविकांना जाण्यासाठी चारही प्रवेशद्वार खुले करावेत

26 जुलैला ग्रामस्थांचा मोर्चा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

साईबाबा मंदिराचे चारही प्रवेशद्वार भाविकांसाठी खुले करावे मोबाईल आणि चप्पल स्टँड तसेच सशुल्क पास देण्याची व्यवस्था प्रवेशद्वाराजवळ करण्यात यावी. या मागण्यांसाठी शुक्रवारी दि. 26 जुलैला शिर्डीतील व्यावसायिक तसेच ग्रामस्थांच्यावतीने शांततेच्या मार्गाने मोर्चाचे आयोजन करून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

मंगळवारी शिर्डीतील व्यावसायिक तसेच ग्रामस्थांनी मोर्चा संदर्भात नियोजनाची बैठक घेतली. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, साईबाबा मंदिराचे चारही प्रवेशद्वार करोना काळात बंद करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी वेळोवेळी उठाव केल्यानंतर प्रवेशद्वार क्रमांक 3 खुले करण्यात आले. यामधून फक्त काही ठराविक ग्रामस्थांना आत प्रवेश दिला जातो. मात्र सर्वसामान्य साईभक्तांना या प्रवेशद्वारातून जाण्यास मनाई केली जाते. दिव्यांग, वयोवृद्ध, साई भक्तांना शेजारील अडचणीच्या प्रवेशद्वाराने प्रवेश दिला जातो. व्हीआयपी साई भक्तांना प्रवेश द्वार क्रमांक 2 मधून आत किंवा बाहेर जाण्यासाठी प्रवेश दिला जातो तर प्रवेशद्वार क्रमांक 4 मधून संस्थान कर्मचारी व अधिकार्‍यांना आत व बाहेर जाण्यास मुभा आहे. तसेच प्रवेश द्वार क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद करून प्रवेश द्वार क्रमांक 5 ने भाविकांना बाहेर सोडले जाते. साईभक्तांना व ग्रामस्थांना मंदिर परिसरातील शनिदेव, महादेव, गणेश व दत्त मंदिर, नंदादीप, ध्यानमंदिर व गुरुस्थान आदी ठिकाणी दर्शनाला जाण्यासाठी संपूर्ण दर्शन रांगेतून समाधी मंदिरद्वारे जावे लागते. त्यामुळे एवढ्या मोठ्या दर्शन रांगेतून पायी चालून जाणारे भक्त पुन्हा आत जाण्यास मोठे गरजेचे होते.

शिर्डीत दोन दिवस मुक्काम करून पूर्वीप्रमाणे मंदिर परिसरात शांतपणे बसावे, बाबांचे नामस्मरण करावे, अशी अनेक भाविकांची मनस्वी इच्छा असते. परंतु चुकीच्या नियोजनामुळे भक्तांना एकाच दिवसात शिर्डीतून बाहेर जावे लागते. यामुळे भाविकांमध्ये मोठी नाराजी दिसून येते. त्याचा परिणाम शिर्डीतील व्यावसायिकांच्या अर्थकारणावर झाला आहे. या सर्व गोष्टी ग्रामस्थांनी वेळोवेळी साईबाबा संस्थान प्रशासनातील अधिकार्‍यांना निदर्शनास आणून दिल्या. परंतु अधिकारी याबाबत योग्य तो निर्णय घेण्याऐवजी याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. तसेच साई उद्यान इमारतीत लाडू काउंटर व सशुल्क दर्शन पास व्यवस्था सुरू करावी, गर्दी कमी असताना भक्तांना पूर्वीचे 16 गुंठे शेजारील प्रवेशद्वाराने दर्शनास सोडावे, जेणेकरून भक्तांना साई समाधीचे वेळेतच दर्शन होईल. तसेच चारही प्रवेशद्वारांमधून भाविकांना दर्शनासाठी आत बाहेर जाण्यास खुले करावे.

यासंदर्भात निवेदन देण्यासाठी शांततेच्या मार्गाने मोर्चाद्वारे शुक्रवार 26 जुलै रोजी सकाळी ठीक 10 वाजता मारुती मंदिराजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन शिर्डीतील सर्व व्यावसायिक व ग्रामस्थांना मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले. हा मोर्चा शिर्डीतील व्यावसायिक तसेच ग्रामस्थांच्या हितासाठी असून यात कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही, असे यावेळी व्यापारी असोसिएशन तसेच ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले. या बैठकीसाठी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, किशोर गंगवाल, रमेश गोंदकर, नितीन उत्तमराव कोते, निलेश कोते, अमृत गायके, गोपीनाथ गोंदकर, सुधाकर शिंदे, संदीप पारख, भरत चांदोरे ,नरेश पारख, विजय संकलेचा, गोकुळ ओस्तवाल, संपत जाधव, सुरेश पाटणी, रवींद्र गोंदकर, विकास गोंदकर व आदी शिर्डीतील व्यापारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

साई दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना मंदिर परिसरात जाण्यासाठी प्रवेश दिला जात नसल्यामुळे साई भक्तांना मंदिर परिसरातील ध्यान मंदिर, ग्रंथालय, लेंडी बाग, म्युझियम याठिकाणी जाता येत नाही त्यामुळे दर्शन घेतल्यानंतर भाविक लगेच परतीच्या प्रवासाला निघतात. परिणामी याचा फटका शिर्डीतील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
– किशोर गगवाल, व्यावसायिक

- Advertisment -

ताज्या बातम्या