Friday, November 22, 2024
Homeनगरसाई मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यासाठी शिर्डीकरांमध्ये चढाओढ

साई मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यासाठी शिर्डीकरांमध्ये चढाओढ

श्रेयवादासाठी दोन गटांकडून दोन वेगवेगळ्या मोर्चांचे आयोजन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईभक्तांना मंदिर परिसरात जाण्या-येण्यासाठी चारही प्रवेशद्वार खुले करावे म्हणून मंगळवारी शिर्डीतील व्यावसायिक व ग्रामस्थांनी बैठक घेऊन 26 जुलैला मोर्चाचे आयोजन करण्यासंदर्भात नियोजन केले तर आम्हाला याबाबत कुठलीही माहिती दिली नाही व विश्वासात घेतले नाही म्हणून नाराज झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी 1 वाजता मोर्चाचे नियोजन करीत साई संस्थान कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. एकाच प्रश्नासाठी शिर्डीतील ग्रामस्थांमध्ये दोन वेगवेगळ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्यामुळे या दोन्ही गटाच्या श्रेयवाद लढ्याची चर्चा शिर्डीत चांगली रंगली आहे.

- Advertisement -

बुधवारी एका गटाकडून मोर्चा काढून साईभक्त व ग्रामस्थांना आत-बाहेर जाण्यासाठी चारही गेट सुरू करा, सुरक्षेचा बागुलबुवा दाखवून ग्रामस्थ व भाविकांना छळू नका, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी साई संस्थान प्रशासनाला दिला. साईमंदिर परिसराचे गेट पुर्वीप्रमाणे आत-बाहेर जाण्यासाठी खुले करावे तसेच मंदिर सुरक्षेसाठी सीआयएसएफ नियुक्त करताना संस्थान प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावना त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीसमोर ठामपणे मांडाव्यात, त्या समितीत स्थानिक लोकप्रतिनीधींचाही समावेश असावा या प्रमुख मागणीसाठी बुधवारी ग्रामस्थ एकवटले होते.

यावेळी अभय शेळके, शिवाजी गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय जगताप, सचिन शिंदे, संदीप सोनवणे, सचिन तांबे, संजय शिंदे, सुजित गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, कमलेश लोढा, केतन कोते, प्रमोद गोंदकर, तान्हाजी गोंदकर, प्रशांत कोते, सचिन कोते, अमोल गायके, तानाजी गोंदकर, चेतन कोते आदींच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी एकच्या सुमारास मारुती मंदिराजवळून शेकडो ग्रामस्थ मोर्चाने पालखी रस्त्याने चार नंबर गेट समोर गेले. तेथे प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्थान प्रशासनाने सुरक्षेच्या नावाखाली प्रवेशद्वारांवर निर्बंध घातल्याने भाविक व ग्रामस्थांचा एक प्रकारे छळ सुरू आहे.

मंदिर परिसरातील ग्रामदैवतांच्या दर्शनाला जाणेही अवघड आहे. या निर्बंधामुळे शहरातील पश्चिम भाग वगळता सर्व बाजुंचे व्यवसाय पूर्णपणे संपले आहेत. त्यामुळे हे गेट तत्काळ खुले करावे. वृद्ध, अपंग भाविकांना मोठा फेरफटका मारायला लावण्याऐवजी सर्व द्वारांमधून आत-बाहेर जाता यावे, प्रवेशद्वारावर व्हील चेअर, चप्पल, मोबाईल स्टॅन्डची सुविधा असावी, अशी मागणीही करण्यात आली. सीआयएसएफ ही सुरक्षा यंत्रणा राष्ट्रपती भवन, विमानतळे, औद्योगिक वसाहती यांच्यासाठी असते. साईमंदिर ही औद्योगिक नाही तर धार्मिक संस्था आहे. येथे श्रद्धेला महत्व आहे. सध्याच पाच प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे. तिच्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना आणखी एक सुरक्षा यंत्रणा कशासाठी, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामस्थांचा आणखी एक गट 26 जुलै रोजी याच मुद्यावर साईसंस्थानला जाब विचारणार आहे.

ग्रामस्थांच्या भावना संस्थान व्यवस्थापनासमोर आणि सीआयएसएफसाठी नेमलेल्या समितीत मांडू व सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करू, भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ग्रामस्थ व संस्थान मिळून प्रयत्न करू, त्यासाठी संवाद व समन्वय ठेवू.
– गोरक्ष गाडीलकर, सीईओ साईबाबा संस्थान

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या