वादग्रस्त फलक लावण्यामागाचा उद्देश काय? शिवसेनेचे बसस्थानकात आंदोलन
शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डी येथील बसस्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमीचा फलक लावल्याने त्या वादाला नव्याने तोंड फुटले आहे. हा वादग्रस्त फलक तातडीने काढण्यात यावा म्हणून काल शिवसेना आक्रमक झाली होती. याबाबत त्यांनी शिर्डी बस डेपो व्यवस्थापकांना निवेदन देऊन हा बोर्ड हटविला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर काही वेळातच बस डेपो व्यवस्थापकांनी हा बोर्ड हटविला आणि या वादावर पडदा टाकला.
साई समाधी शताब्दी वर्षानिमित्ताने उद्घाटन समारंभाप्रसंगी राष्ट्रपती शिर्डी येथे आले असता त्यावेळी त्यांच्या वक्तव्यातून साईबाबांच्या जन्मभूमीबद्दल जो वाद निर्माण झाला होता त्यामुळे शिर्डीसह राज्यात तसेच देशात भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली होती; परंतु राष्ट्रपतींना भेटून संवाद संपुष्टात आला होता. त्यास वर्ष दीड वर्षे उलटत नाही तोच शिर्डी बसस्थानकात साईबाबांच्या जन्मभूमीचा फलक लावून पुन्हा वाद निर्माण होण्याचा प्रयत्न चालविला आहे. शिर्डी आगाराचा हा वादग्रस्त फलक लावण्यामागे नेमका काय उद्देश असावा याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. या वादग्रस्त फलकाच्या विरोधात काल शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली.
दरम्यान शिर्डी येथील बसस्थानकात साईबाबांची जन्मभूमी पाथरी येथे जाण्यासाठी बसचे वेळापत्रकाचा चौकशी कक्षाच्या खिडकीवर फलक लावल्याने साईभक्त संभ्रमात पडले. बसच्या वेळा विचारण्यासाठी जाणार्या प्रत्येक भाविकांच्या नजरेसमोर हा फलक येत असल्याने काही भाविकांनी पाथरी गावांबाबात विचारपूस सुरू केली आहे. सदर फलकाबाबत साईबाबा संस्थान काय कारवाई करते तसेच शिर्डी ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लक्ष वेधले आहेत. दरम्यान साईसमाधी शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी शिर्डीत झालेल्या कार्यक्रमात महामहीम राष्ट्रपती यांनी साईबाबांच्या जन्मस्थळा संदर्भात पाथऱी गावाचा उल्लेख केल्याने साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
यामुळे नव्या वादाला तोंड फुटल्याने याबाबत शिर्डीतील भाजप-शिवसेना पदाधिकार्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि साईबाबांनी आयुष्यभर जपलेली सर्वधर्म समभावाची ओळख जपण्यास सहकार्य करावे अशी साईभक्तांची भावना आहे. यापूर्वी अनेकांनी साईबाबांचे जन्मस्थळ, जात किंवा आईवडील कोण होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आपण कोण आहोत हे साईबाबांनीच अखेरपर्यंत गोपनीय ठेवले आहे. साईबाबांच्या जन्मस्थळा संदर्भात कोठेही कोणताच उल्लेख नसताना बाबांचे जन्मस्थान म्हणून पाथरीची ओळख नको.
पाथरी गावाच्या विकास संदर्भात आमचे दुमत नाही मात्र साई बाबांचे जन्मस्थळावर शिक्कामोर्तब झाल्यास सर्वधर्म समभावाची ओळख पुसली जाईल असेही यावेळी नमूद करण्यात आले होते. मात्र या प्रकरणास वर्ष सरत नाही तोच शिर्डी येथील बसस्थानकात चौकशी कक्षाच्या बाहेरील मध्यवर्ती भागात साईबाबांची जन्मभूमी पाथरी अशा आशयाचे बसचे वेळापत्रक लावण्यात आले असून बसस्थानकात येणारे लाखो भाविक संभ्रमात पडले आहेत. या फलकामुळे पुन्हा एकदा साईबाबांच्या जन्मभूमीचा वाद चव्हाट्यावर येतो की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा फलक लावण्याचा उद्देश काय आहे आणी यामागचा हेतू काय आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.
काल सकाळी हा वादग्रस्त फलक हटविण्याबाबत शिवसेनेच्या वतीने बस आगारात जाऊन आंदोलन करण्यात आले होते. त्यांनी हा फलक हटविला नाही तर या आंदोलनाचे स्वरुप व्यापक होऊ शकेल असा इशारा देताच त्यांनी हा वादग्रस्त फलक तेथून हटविला.
यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते, विजयराव जगताप, तालुका प्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, शिवसेना ग्राहक कक्षाचे मुकुंद सिनगर, विठ्ठल पवार, अक्षय तळेकर, सुयोग सावकारे, अमोल गायके,जयराम कांदळकर, पुंडलीक बावके, सोमनाथ कोते, चंद्रकांत कोते, संजय मुदलीयार, रवींद्र सोनवणे, महेश महाले, दत्ता भालेराव, विश्वजित बागुल, विरेश गोंदकर, महेंद्र कोते, अनिल पवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.