Tuesday, January 6, 2026
HomeनगरPathardi : संत भगवान बाबा मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Pathardi : संत भगवान बाबा मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

लाखो भाविकांची मांदियाळी || महाप्रसादासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांचा वापर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगडावर श्री संत भगवानबाबांचा पुण्यतिथी महोत्सव भक्तिमय वातावरणात रविवारी(दि.4) उत्साहात पार पडला. पहाटेपासूनच भगवानगडाच्या दिशेने भाविकांचा अखंड ओघ सुरू होता. संत भगवानबाबांच्या जयघोषांनी संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता. सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांच्यावतीने हेलिकॉप्टरमधून समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पहाटे संत भगवानबाबांच्या समाधीची महापूजा, अभिषेक व अन्य धार्मिक विधी विधिवत पार पडले. समाधी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

- Advertisement -

अनेक भाविकांनी उपवास, नवस व अभिषेक अर्पण करून संत भगवानबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. सकाळपासून संपूर्ण परिसरात भक्तिरस ओसंडून वाहत होता. दुपारी गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाले. त्यांच्या ओजस्वी व भावस्पर्शी वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनानंतर महाप्रसादाची महापंगत पार पडली. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. भगवानगडावर भव्य व आकर्षक मंडप उभारण्यात आला होता. भाविकांच्या सोयीसाठी गडाच्या पायथ्याशी वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व स्वयंसेवकांची विशेष नेमणूक करण्यात आली होती. भाविकांसाठी सुमारे शंभर क्विंटल साखरेपासून बुंदी तसेच चिवड्याचा महाप्रसाद तयार करण्यात आला. या महाप्रसादासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांचा वापर करण्यात आला. रांगेत उभ्या असलेल्या भाविकांपर्यंत सहज व शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद पोहोचवण्यात आला.

YouTube video player

भगवानगडाला अध्यात्मिक क्षेत्रात मानाचे स्थान असून, ऊसतोड, शेतकरी, मजूर व कामगारांचे श्रद्धास्थान म्हणून ते ओळखले जाते. भगवानगड आज राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. भगवानगडावर सुरू असलेले संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर, ज्ञानेश्वरी विद्यापीठ, विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, दररोजचे मोफत अन्नदान, धार्मिक व शैक्षणिक उपक्रम हे गडाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहेत. या कार्यामुळे भगवानगड केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचेही केंद्र ठरत आहे. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी गडाचे प्रधानाचार्य नारायण स्वामी, येळेश्वर संस्थानचे रामगिरी महाराज, राधाताई सानप, कॉन्ट्रॅक्टर भगवान दराडे, बाळासाहेब सानप, प्रदीप पाटील, प्रा. सुभाष शेकडे, प्रा. राजकुमार घुले आदी उपस्थित होते. उद्योजक बिहाणी परिवाराच्यावतीने महाप्रसादाची पंगत देण्यात आली.

ज्यांनी गडाशी वैर घेतले, त्यांची अवस्था…
महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री म्हणाले, भगवान बाबांच्या इच्छेविना काहीच घडत नाही. भगवान बाबांच्या गादीवर बसलेला महंत हा बाबांच्या संरक्षणातच असतो. यात कोणताही अहंकार नसून, ती केवळ संत भगवानबाबांवरील अढळ श्रद्धा व निष्ठा आहे. ज्यांनी गडाशी वैर घेतले, त्यांची अवस्था भगवान बाबांनीच ठरवली असून ती पाहण्याइतकीही स्थिती उरलेली नाही. त्यामुळे गडाला धडक देऊ नका, अन्यथा बरबादी अटळ आहे. संसार करायचा असेल तर शांततेने करा; कारण गडाला नडलेले कायमचे संपले आहेत.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...