श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील कोकणगाव येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 14 गोवंशांची सुटका गोरक्षकांनी केली. मात्र, यावेळी स्थानिक लोकांसह उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते साजन पाचपुते याने हस्तक्षेप करत गोरक्षकांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी गोरक्ष सामाजिक संस्थेचे सदस्य अक्षय राजेंद्र कांचन (वय 25 रा. महादेवनगर, उरूळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुस्तफा कुरेशी, इब्राहिम कुरेशी, आतिक कुरेशी, साजन सदाशिव पाचपुते, महेश चव्हाण, शारदा महेश चव्हाण आणि तंटामुक्ती अध्यक्ष शिंदे यांच्याविरोधात रविवारी (9 मार्च) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरक्ष सामाजिक संस्थेचे सदस्य अक्षय कांचन आणि त्यांच्या सहकार्यांना कोकणगाव येथील एका शेतात बेकायदेशीरपणे बांधून ठेवलेले गोवंश असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना सोबत घेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, 14 जर्सी जातीच्या गायी कोणत्याही चारा-पाण्याशिवाय उपाशी ठेवून कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आल्याचे आढळले. गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने या गोवंशांची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिक लोकांनी गोंधळ घालत अडथळा निर्माण केला. त्यावेळी शिवसेना उपनेते साजन पाचपुते याने फोनवरून गोरक्षकांना धमकी दिली आणि कत्तलीसाठी जनावरे नेण्यास अडथळा आणल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला आहे.
दरम्यान, गोवंशांची सुटका करत असताना स्थानिक एका समाजातील काही लोक आणि इतरांनी गोरक्षकांवर दगडफेक केली. तसेच, पोलिसांनाही धमक्या देत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर गोरक्षकांनी हिरडगाव फाट्यावर पोहोचून टेम्पोच्या मदतीने या गायींना गोशाळेत रवाना केले. अक्षय कांचन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.