अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी खा.डॉ. सुजय विखे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी प्रयत्न करून साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणास मंजुरी आणली होती. पण पाणी उपलब्ध प्रमाणपत्राची अट असल्यामुळे सर्व्हेक्षणास सुरुवात होत नव्हती. ती अट वगळून नव्याने साकळाई सर्व्हेक्षणाचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच सर्व्हेक्षणासाठी 2 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायत भागातील 32 गावांसाठी साकळाई पाणी योजना वरदान ठरणारी आहे.28 वर्षांपासून या योजनेची मागणी होत आहे. पण फक्त आश्वासनांशिवाय जनतेच्या पदरी काही पडत नव्हते. 2018 च्या लोकसभा निवडणुकीवेळी डॉ.विखे यांनी या योजनेचा पाठपुरावा सुरू केला. वाळकी (ता.नगर) येथील जाहीर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही साकळाई योजना पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
पण पुढे महाविकास आघाडी सरकार काळात त्यावर फार काम झाले नाही. 2022 मध्ये पुन्हा भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आल्यावर खा.डॉ. विखे, आ. बबनराव पाचपुते, माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार अव्वर सचिव संदीप भालेराव यांनी गुरूवारी कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ यांना आदेश काढले असून त्यात पाणी उपलब्धता प्रमाणपत्र अट वगळून साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणास परवानगी देण्यात आली असल्याची व त्यासाठी 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले आहेत.