अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कुकडी-घोड प्रकल्पात उपलब्ध होणार्या पाण्यातून साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी पाणी मिळावे, योजनेसाठी पाणी उपलब्धतेचा दाखला तातडीने देण्यात यावा, यासाठी साकळाई कृती समिती व नगर-श्रीगोंद्यातील पुढार्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. साकळाई योजनेच्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य ओळखण्याचे आवाहन कृती समितीने करत यापुढे पाणी उपलब्ध दाखला मिळण्यासाठी सिंचनभवनवर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे.
गेल्या 30 वर्षांपासून गाजत असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी पाणी उपलब्ध प्रमाणपत्र तातडीने मिळावे, साकळाईच्या आराखड्यात मंजुरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी साकळाई कृती समितीच्यावतीने नगर- दौंड महामार्गावर खडकी येथे काल, रविवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, घनश्याम शेलार, संतोष लगड, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, राजेंद्र म्हस्के, सोमनाथ धाडगे, सुवर्णा पाचपुते, ज्ञानदेव भोसले, नारायण रोडे, दादा दरेकर, अजिनाथ गायकवाड, दत्ता काळे, रघुनाथ चोभे, महेश कोठुळे, अरुण कोठुळे यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून साकळाई योजनेचा लढा सुरू आहे. या योजनेच्या नावाखाली अनेकांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्यात. पण आता शेतकरी हुशार झाले आहेत. साकळाईच्या जिवावर मोठे झालेल्यांना शेतकरी चांगलाच हिसका दाखवतील. आतापर्यंत साकळाईला पुणेकरांचा विरोध असल्याचे सांगितले जात होते. शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली. साकळाईबाबत भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली. त्यांनी साकळाईला आमचा विरोध नसल्याचे सांगत सध्याच्या सरकारने योजनेचा प्रश्न सोडवावा.
या सरकारने साकळाईचा प्रश्न न सोडविल्यास महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर हा प्रश्न मार्गी लावण्याची माझी जबाबदारी असेल, असे सांगत कृती समितीला आश्वस्त केले असल्याचे झेंडे यांनी सांगितले. यावेळी कुकडी प्रकल्प विभागाचे अधिकारी कदम यांनी साकळाईच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तर रास्तारोको आंदोलनासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.