साक्री – Sakari – प्रतिनिधी :
तालुक्यातील कासारे येथे व्यापारी दुकाने बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्यांचे वाहन व्यापारी व दुकानदारांनी अडवून धरले. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने साक्री तहसील प्रशासनाकडून व्यापार्यांची दुकाने बंद करण्यासंदर्भात आदेश देण्यात आला होता. त्यास व्यापारी आणि दुकांनदारांनी चांगला प्रतिसाद देत संपूर्ण गावातील दुकाने बंद केले होते. मात्र गेल्या एक महिन्यापासून बंद असलेली व्यापारी, व्यावसायिकांनी आपला व्यवसाय थोड्याफार प्रमाणात सुरू केला होता.
आज दि.3 रोजी साक्री पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी कासारे गावातील दुकाने बंद करण्यासाठी गेले असता व्यापार्यांनी दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवून पोलीस वाहन अडवून धरले. त्यामुळे बाजारपेठत काही काळ तणाव निर्माण झाला होता. गेल्या एक महिन्यापासून दुकाने बंद असल्यामुळे आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. गाळेभाडे, लाईट बिल भरण्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असे प्रश्न उपस्थित केला.
व्यापारी, दुकाने पाच वाजेपर्यंतसुरू राहु द्यावी. गावातील दुकाने बंद असल्यामुळे तसेच संपूर्ण कासारे गाव बंद परिस्थितीत असून काही व्यापार्यांनी ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असेल तेवढा तीनशे मीटर परिसर कंटेनमेंट क्षेत्र जाहिर करून कंटेनमेंट क्षेत्राच्या बाहेर व्यापारी दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी व दुकानदारांनी पोलिसांसमोर लावुन धरली.
यावेळी काही व्यापार्यांनी मध्यस्थी करून व्यापार्यांची व ग्राहकांची पिळवणूक होणार नाही. यासाठी मंगळवारी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी दर्शविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.