जी.टी.मोहिते
साक्री। Sakri ।
साक्री नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) नगराध्यक्षपदाचे (Mayor) आरक्षण (Reservations)अनुसूचीत जमातीतील महिलांसाठी राखीव झाले. साक्रीत या जमातीतून दोन महिला (Women) निवडून आल्या असून दोन्हीही भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) तिकीटावर विजयी झाल्या आहेत. सत्ता भाजपाचीच बसेल हे उघड असले तरी दोन्ही आडनावाने पवार असलेल्या उमेदवारांपैकी कोण ‘पावरफुल’ ठरेल याबाबत उच्छूकता आहे.
दोन्ही उमेदवारांमध्ये प्रभाग तीन मधील उषाबाई अनिल पवार आणि प्रभाग आठ मधून विजयी झालेल्या जयश्री हेमंत पवार यांचा समावेश आहे.
साक्री नगर पंचायत निवडणुकीत मतदारांनी चाळीस वर्षात सत्तांतर केले आहे. एकूण 17 जागांपैकी अकरा जागा जिंकत भाजपाकडे बहुमताचा आकडा आहे. तर शिवसेनेने चार, एक काँग्रेस, एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. साक्री नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी आघाडी तसेच भाजपा यांच्यातच चुरशीचा सामना झाला. निकाला अंती भाजपाने मुसंडी मारत अकरा जागा जिंकल्या. आरक्षण अनुसूचित जमाती स्त्री नगराध्यक्ष पदाचे निघाल्याने प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उषाबाई पवार आणि जयश्री पवार निवडणुकीत विजयी झाल्या.
दोघेही नगराध्यक्षपदाच्या दावेदार असलेल्या महिला उच्चविभूषीत असल्याने कोणत्या ‘पवार’ पावरफुल ठरणार हे नगराध्यक्ष उमेदवारी दिल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दोन्हीही नवनिर्वाचीत नगरसेवक महिलांना कोणताही राजकीय वारसा नाही. उषाबाई यांचे पती अनिल पवार सि.गो. पाटील महाविद्यालयात प्राध्यापक आहे. तर जयश्री यांचेही पती एका संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी भाजपाकडे उमेदवारी मागीतली आणि प्रचंड मतांनी निवडून आल्या.
साक्री नगर पंचायत निवडणुकीत भाजपाची राज्याची कोअर कमेटीकडे दोन्ही नावे जाणार असून नगराध्यक्षपदाची चाळणी लावली जावून नाव निश्चीत केले जाणार असल्याचे भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.
धुळे शहर भाजपाचे अध्यक्ष अनुप अग्रवाल साक्री नगरपंचायत निवडणुकीचे प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबध्द पध्दतीने प्रभागवार उमेदवारांची निवड झाली आणि जनतेनेही उमेदवारांना भरभरुन मतदानरुपी आशिर्वाद दिल्याने 11 नगरसेवक निवडून आले. कुणालाही विश्वास बसणार नाही असा चमत्कार मतदारांनी करुन भाजपाच्या हातात बहुमताची सत्ता दिली. आता नगराध्यक्ष पदाची माळ भाजपा कुणाच्या गळ्यात घालणार, याबाबत उच्छूकता आहे.