नाशिक । Nashik (प्रतिनिधी)
एसटी महामंडळाच्या सेवकांना जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याचे वेतन 7 ऑक्टोबर पूर्वी किंवा 7 ऑक्टोबर रोजी द्यावे अन्यथा एसटी महामंडळाविरोधात न्यायालयात जाण्याची व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर नोटीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली आहे.
करोना महामारीमुळे केंद्र व राज्यसरकारने दि.23 मार्च, 2020 पासून एसटी सेवा बंद केली होती. त्यानंतर दि. 22 मे पासून बससेवा सुरू करण्यात आली असुन दि. 17 सप्टेंबर 2020 पासून बसेसमधून पूर्ण आसनक्षमतेने प्रवाशी वाहतूक कर्नाटक, गुजरात राज्याच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेली आहे. एस.टी. सेवक रात्रंदिवस प्रवाशांची सेवा करीत आहेत.
असे असतांना एसटी सेवकांचे वेतन शासकीय, निमशासकीय व इतर महामंडळातील सेवकांपेक्षा अत्यंत कमी आहे. त्यातच तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे काही सेवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याचे इंटकने म्हटले आहे. ‘तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही तरीपण आम्ही सेवा देत आहोत’अशा आशयाचे स्टीकर लावून सर्वत्र गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे.
एस.टी. कर्मचा-यांचे माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्याचे वेतन दि. 7 ऑक्टोबर, 2020 पुर्वी किंवा 7 ऑक्टोबर, 2020 रोजी देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी कायदेशीर नोटीस अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आली आहे.
मुकेश तिगोटे, सरचिटणीस, इंटक