Friday, September 20, 2024
Homeनगरटॅगिंग असणार्‍या जनावरांचीच खरेदी-विक्री

टॅगिंग असणार्‍या जनावरांचीच खरेदी-विक्री

16 लाख जनावरांच्या कानात बिल्ले || शेळ्या-मेंढ्यांच्या टॅगिंगचे काम सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांना कानातील टॅग लावणे बंधनकारक केले आहे. 1 जूनपासून असे टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची खरेदी-विक्रीसह वाहतूकही करता येणार नाही. नगर जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय 16 लाख जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाले आहे, तर शेळी-मेंढीवर्गीय 15 लाख जनावरांचे टॅगिंग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाचा भाग म्हणून भारतीय पशुधन प्रणाली लागू केलेली आहे. ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे कान टॅगिंग

रेकॉर्ड करते. परिणामी जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचे तपशील यासारखी माहिती यातून उपलब्ध होईल. या नवीन आदेशानुसार पशुपालकांना आपल्या जनावरांचे इअर टॅगिंग करून घेणे आवश्यक ठरलेले आहे. राज्य शासनाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्व पशुपालकांना 31 मार्चपर्यंत आपल्या पशुधनाचे इअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले होते. आताही जनावरांना टॅगिंग करण्यात येत आहे तसेच ही माहिती भारतीय पशुधन प्रणालीवर अपडेट करणे आवश्यक आहे.

ज्या जनावरांच्या कानाला इअर टॅगिंग नसेल अशा जनावरांची 1 जूननंतर वाहतूक करणे बेकायदेशीर ठरणार आहे तसेच इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची खरेदी आणि विक्रीही करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. टॅगिंग असणार्‍या जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या निर्णयाचे आदेश आदेश पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहे. हे आदेश काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.

प्रत्येक पशुपालकाने नजीकच्या पशुसेवा केंद्रात जाऊन टॅगिंग करून घ्यावे. शासनाच्या विविध योजनांसाठी ते महत्त्वाचे आहे. 1 जूननंतर जनावरांची खरेदी-विक्री टॅग असल्याशिवाय होणार नाही, पशूसंवर्धन विभाग पशूपालकांच्या सोयीसाठी ही प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली.

योजनांचा हिशेब ठेवता येणार
टॅगिंग असेल तर जनावरांची कत्तल रोखण्यासाठी कारवाई करण्यास सोपे जाईल. शिवाय शासनाच्या विविध योजना राबवताना सुलभता येईल, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पशुसंवर्धन विभागाने मोठ्या कष्टाने टॅगिंगचे काम सुरू ठेवत ते पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे.

उपचारही होणार नाहीत
ज्या जनावरांच्या कानाला टॅगिंग नाही, अशा जनावरांसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून आर्थिक मदत मिळणार नाही. कारण, नैसर्गिक आपत्ती, विजेचा झटका, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनासाठी मदत देण्यात येते, ती कानाला टॅग न लावल्यास मिळणार नाही. तसेच कानाला टॅगिंग नसेल तर त्या जनावरांवर उपचारही करण्यात येणार नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या