शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
जीवनात अनेक अडचणी आल्या मात्र साईबाबांचे नामस्मरण केल्याने त्या दूर झाल्या. साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा आणि सबुरीच्या महामंत्राला धरून चालल्याने अडचणी दूर झाल्याचा दृढ विश्वास अभिनेता सलमान खानच्या मातोश्री सलमा खान यांनी व्यक्त केला. अभिनेता सलमान खानची आई सलमा खान यांनी कुटुंबासह रविवारी साई दरबारी हजेरी लावून साईचरणी नतमस्तक झाल्या. साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याहस्ते सलमा खान व कुटुंबियांचा शॉल, साई मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी, साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.
सलमान खानचा नुकताच 59 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. भाईजानचा वाढदिवस साजरा केल्यानंतर आई सलमा खान आणि बहीण अलवीरा अग्निहोत्री यांच्या कुटुंबियांनी सलमानच्या यश आणि दीर्घायुष्यासाठी शिर्डीत येऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. सलमा खान या साईभक्त असून नेहमी त्या दर्शनासाठी शिर्डीला येत असतात. मात्र मध्यंतरी करोना महामारीच्या काळात त्यांना साईबाबांच्या दर्शनासाठी येता आले नाही. आज खुप वर्षांनी साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्या भावूक झाल्याचे दिसून आले. बाबांच्या दर्शन वेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या कुटुंबियांवर राहिला आहे, साईबाबांचा आशीर्वाद असाच कायम राहो ,अशी प्रार्थना सलमा यांनी साईचरणी केली.