अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
समर्थ क्रॉप केअर ट्रेड प्रा. लि. या कंपनीने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून केलेल्या आर्थिक फसवणूकप्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केली असून, आतापर्यंत 12 संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. या प्रकरणात सुमारे 4 कोटी 3 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. राजेंद्र वसंत चंदनशिवे (वय 45, रा. हिंगणी, ता. कोपरगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
यापूर्वी कंपनीचा चेअरमन तथा मुख्य संशयित आरोपी प्रशांत अनिल गवळी (रा. हडपसर, पुणे, मुळ रा. सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. समर्थ क्रॉप केअर ट्रेड प्रा. लि. या कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षक व जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी श्रीगोंदा आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. दोन्ही गुन्ह्यांचा सखोल आणि एकत्रित तपास करण्यासाठी हे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ कोठुळे तपास करीत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तपासादरम्यान आरोपींची संख्या 12 वर पोहोचली असून, फसवणुकीची रक्कमही 4 कोटी 3 लाख रूपयांपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेंद्र चंदनशिवे याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून तपासात काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची साखळी आणि अन्य संबंधित व्यक्तींची भूमिका तपासण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आता अहिल्यानगरसह पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे.
गुंतवणूकदारांनी जबाब नोंदवावा
समर्थ क्रॉप केअर ट्रेड प्रा. लि.मध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी गुंतवणूकीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून आपला जबाब नोंदवावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक कोठुळे यांनी केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील फसवणुकीची एकूण व्याप्ती स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.




