सांगली । Sangali
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर सोमवार, 14 एप्रिल रोजी रात्री भटक्या कुत्र्याने हल्ला केला. सांगलीतील एका धारकरीच्या घरी जेवण करून परत येताना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला.
हल्ल्यानंतर भिडे यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संभाजी भिडे हे 80 वर्षांहून अधिक वयाचे आहेत.
कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी ओळखले जाणारे भिडे यांच्यावर अनेक वेळा सामाजिक तणाव निर्माण केल्याचे आरोप झाले आहेत. ते वादग्रस्त विधानांमुळेही अनेकदा चर्चेत राहिले आहेत.
अलीकडेच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या वादात त्यांनी आपली भूमिका मांडली होती. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मताचा विरोध करत भिडे यांनी, वाघ्याने छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेतल्यामुळे त्याचे स्मारक असावे, असे मत व्यक्त केले होते.
1980 च्या दशकात भिडे यांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापना केली. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा या भागांत त्यांचे हजारो समर्थक असून, अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे संबंध आहेत. मात्र, त्यांनी कधीही कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही.