Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रसंभाजीराजे यांचे नेतृत्व मान्य नाही

संभाजीराजे यांचे नेतृत्व मान्य नाही

मुंबई |Mumbai

संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

- Advertisement -

औरंगाबाद येथेे माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, छत्रपती शंभाजीराजे आमचं नेतृत्व करु शकत नाहीत. ते गादीवर आहेत, त्या गादीचा आम्ही मान ठेवतो. पण त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा डाव रचला आहे. काही लोक आमचं नेतृत्व करायला निघाले आहेत. नेतृत्व जर करायचं असेल तर ते सर्वसमावेशक असायला हवं, असं आमचं मत आहे. ज्यावेळी कोपर्डीचं प्रकरण घडलं त्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो. पण कालच्या बैठकीला त्यातील कोणीही नव्हतं. मराठा समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी संभाजीराजेंना कोणी दिली? ते आम्हाला मान्य नाही. आम्ही यापूर्वीही सांगितलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचं नेतृत्व आहेत.

म्हणून आम्ही इशारा देतोय की, तुम्ही रात्रीच्या अंधारात बैठक घेता, हे काय चाललं आहे. सर्वव्यापक बैठक का घेत नाहीत. अचानक दोन दिवसात बैठक का बोलवता? त्या बैठकीला व्यापक बैठकीचं स्वरुप देता. मोजके चेहरे गोळा करता आणि काय चर्चा करता? मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व कोणाचं नाही. जर व्यवस्थित चर्चा होणार नसेल आणि जवळचा माणूस हाताशी धरुन जर तुम्ही आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेणार असाल तर तुमची पळता भुई थोडी करु असंही यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी सरकारच्या प्रतिनिधींना बजावलं आहे.

संभाजीराजे यांचे रोखठोक उत्तर

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी काही आज आलेलो नाही. 2007 पासून मी या चळवळीत पूर्णतः सक्रिय आहे. माझा राजवाडा, घरदार सोडून, वैभवसंपन्न जीवनशैली सोडून समाजासाठी राज्यभर फिरत असतो. संसदेत सुद्धा मराठा आरक्षणावर बोलणारा मी पहिला आणि कित्येक वर्षे एकमेव खासदार होतो. संसदेच्या प्रांगणात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारा मी एकमेव व्यक्ती आहे. 2017 साली मुंबई येथे मोर्चाचा स्टेजवर जाऊन समाजाला दिशा दिली.

यामुळे आपले मोठे राजकीय नुकसान होणार याची कल्पना असूनही स्वतःपेक्षा समाजाचा विचार केला. आरक्षण रद्द झाल्यानंतर कित्येकांनी समाजाला हिंसक मार्गाला घेऊन जाऊन राजकीय स्वार्थ साधण्याची रणनीती आखली होती. मात्र, तेव्हा समाजाला वस्तुस्थिती दाखवून सनदशीर मार्गाने हा लढा पुढे नेला. समाजानेही नेहमीच मला प्रेम दिले, पाठबळ दिले. कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झालेला मराठा क्रांती मोर्चा हा सध्या काही जणांनी कुठे नेऊन ठेवलाय, हे समाज उघड्या डोळ्यांनी बघतो आहे.

वेगवेगळ्या पक्षांशी व नेत्यांशी संधान बांधून अनेकांनी वैयक्तिक स्वार्थ साधून घेतले. पाठीशी कार्यकर्ते अथवा संघटनात्मक ताकद नसताना देखील केवळ समाजाच्या नावावर आपल्या पोळ्या भाजल्या. सत्ताधारी व विरोधी पक्षांतील कित्येक राजकीय नेत्यांनी देखील जाणीवपूर्वक अशा लोकांना खतपाणी घातले व आजही घालत आहेत. पण समाज डोळस आहे. तुम्ही फार काळ समाजाला असे फसवू शकत नाही, असे रोखठोक उत्तर छत्रपती संभाजीराजे यांनी भल्यामोठ्या सोशल मीडियावरील पोस्टमधून दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या