बीड | Beed
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. आधी त्यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी राजकीय क्षेत्रातूनदेखील राज्य सरकारवर दबाव टाकला जात आहे. यादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज (१४ डिसेंबर) संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली आहे.
काय म्हणाले संभाजीराजे?
मस्साजोग गावात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेत्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही जातीने यामध्ये लक्ष घाला. अजूनही हा विषय हातातला आहे. लोकांच्या भावना मी ऐकल्या , उद्या काहीतरी स्फोट होईल तर मी जबाबदार असणार नाही. पोलीसांनी साडेतीन तास मजा बघत साधा गुन्हा नोंद केला नाही, आणि त्या वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करूनही तो इकडे तिकडे फिरतो आहे. हे सरकारला कसे चालतेय?” असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला. “मी पूर्णपणे ग्रामस्थांबरोबर आहे, जो ग्रामस्थ निर्णय घेतली त्याबरोबर संभाजीराजे असतील”, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
गावकऱ्यांकडून आरोपांना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील गावकरी करत आहेत. यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी मान्य करत गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर अद्याप दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पुढे बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. सुदर्शन घुले हा फरार आहे. हे कुठल्या पक्षाचे लोक आहेत यांचे अजित पवारांनी परीक्ष करावे. माजी मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालायला हवे होते. आम्ही कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या प्रकरणात जातीने लक्ष घाला. माझी अजितदादांना विनंती आहे की, तुमच्या पक्षाचे लोक आहेत, त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत या मतदारसंघातील आमदाराला मंत्री करू नका, ही माझीच नाही तर येथील सगळ्या ग्रामस्थांची देखील भूमिका आहे.