Friday, June 14, 2024
Homeजळगावभाजपाकडून समसमान जागा वाटपाचा आग्रह!

भाजपाकडून समसमान जागा वाटपाचा आग्रह!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा कणा असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ((Jalgaon Agricultural Produce Market Committee)) निवडणुकीसाठी (election) भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या (BJP-Shiv Sena Shinde faction) वरिष्ठ नेत्यांकडून युती करण्याची घोषणा झालेली असली तरी स्थानिक ठिकाणी भाजपाकडून (BJP)समसमान जागा वाटपाचा आग्रह धरला आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde group) वाढीव जागा मिळण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या जागा वाटपाचा तिढ्याचा प्रसंग कशा पद्धतीने सोडविला जाणार ? याविषयी युतीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यत्यांच्या प्राथमिक बैठकीत खल सुरु आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट अशी महाविकास आघाडीदेखील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दंड थोपटून मैदानात उतरली असून त्यांनी देखील कोणत्या पक्षाला किती जागा वाट्याला येतील याविषयी चर्चा सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत जळगाव कृउबा समितीवर परिवर्तन की भाजप-शिवसेना शिंदे गटाची जादू कायम राहणार ? याविषयी युती आणि महाविकास आघाडीची आता खरी सत्वपरीक्षा ठरणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी पायउतार झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील त्याचे पडसाद उमटले आहेत. सत्ता परिवर्तनानंतर भाजप-शिवसेना शिंदे गट एकत्रित येऊन जळगाव जिल्ह्यातही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात दिलजमाई सुरु झालेली असून जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दोन्ही मंत्री आणि भाजप-शिवसेना शिंदे गटाचे आमदार एकत्रित येऊन जिल्हा दूध संघाची निवडणुकीत खडसे गटाला धूळ चारुन जिल्हा दूध संघ ताब्यात घेतला.

त्याच धर्तीवर जळगाव कृउबा समितीसह जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका देखील भाजप-शिवसेना शिंदे गट एकत्रित लढून आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यादृष्टीने भाजप-शिवसेना शिंदे गटाकडून ग्रामीण भागातील उमेदवारांची चाचणी करुन मुलाखती घेण्याचे काम सुरु आहे. युतीकडून तुल्यबळ उमेदवार देण्यावर सध्या चाचपणी केली जात आहे. मात्र, कोणत्या गटाला किती जागा आणि कोण-कोणाला तिकीट मिळणार याविषयी अजून जाहीर केलेले नसल्याने उमेदवारांमध्ये धाकधुक वाढली आहे. तर काहींनी बंडाचे निशाण उभारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगत आहे.

सन 2016 च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे प्रकाश नारखेडे वगळता जळगाव कृषी बाजार समितीमध्ये शिवसेना आणि लकी टेलर यांचे प्रत्येकी पाच संचालक तर भाजपचे आठ संचालक होते. सर्वाधिक संख्याबळामुळे जळगाव बाजार समितीवर नेहमीच शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे.

आताही जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे चांगल्या प्रकारे जनसंपर्क असल्याने जमेची बाजू आहे. तर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाची धुरा माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्या खाद्यावर असून त्यांच्यासोबतीला सुनिल महाजन, लकी टेलर अशी मंडळी टीममध्ये सहभागी झालेली आहे. मात्र, या निवडणुकीत कोण-कोण उमेदवार राहणार आणि कशा पद्धतीने जागा वाटप होणार याविषयी अजून चित्र स्पष्ट झालेले नाही.

महाविकास आघाडीकडून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धी तुल्यबळ उमेदवार देऊन जळगाव बाजार समितीवर परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. आता घोडा मैदान जस-जसे जवळ येत आहे तशी-तशी चुरस वाढणार आहे. आता दि.20 एप्रिल रोजी अंतीम माघारीनंतर भाजप-शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीतील कोण-कोण उमेदवार रिंगणात राहून लढत देणार ? याकडे जळगाव तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या