मनमाड । वार्ताहर Manmad
‘भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव’ अशी घोषणा देऊन मैदानात उतरलेले लोकप्रिय अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मनमाड शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. भुजबळ यांची निशाणी असलेल्या शिट्ट्यांच्या आवाजाने मनमाड परिसर दुमदुमुन गेला. तसेच, या भव्य रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या रॅलीमुळे मनमाडकरांचा कौल भुजबळ यांनाच असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला. समीर भुजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रॅली पुढे मार्गस्थ होऊन एकात्मता चौक, नुक्कड पान स्टॉल चौकातून पुढे आली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भाग्यलक्ष्मी बँकेसमोरून रॅली महालक्ष्मी चौकातून पुढे गेली. याठिकाणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
पुढे महालक्ष्मी चौक-तेली गल्ली-नीलमणी गणेश मंदिर येथे रॅली आली. गणेश मंदिरात भुजबळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. 52 नंबर येथे रॅली पोहचून क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तेथून महात्मा फुले पुतळा, भगतसिंग मैदान रस्ता, नेहरू भवन चौक, सुभाष रोड मार्गे जैन मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारत जनरल स्टोअर रस्त्याने राम मंदिरकडे रॅली मार्गस्थ झाली. सर्वात शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तुफान चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
मनमाड शहरातून निघालेल्या प्रचार रॅलीत दीपक गोगड, रवींद्र घोडेस्वार, दिलीप नरवडे, संजय निकम, संजय भालेराव, पी आर निळे, मानेकर बाबूजी, सुशील खरे, कैलास अहिरे, वंदेश गांगुर्डे, सचिन संसारे, तौफिक खान, निलेश मानेकर, अमोल गांगुर्डे, दीपक धीवर, प्रमोद जगताप, विष्णू पवार, भागवत मोरे, रमेश भालेराव, जिल्हा अध्यक्ष योगिता पाटील, दीक्षा कडलक, तालुका अध्यक्ष अपर्णा देशमुख, कोमल निकाळे, माया झाल्टे, शहर उपप्रमुख बागुल, सुरेखा चव्हाण, अनिता संसारे यांच्यासहित हजारो जनसमुदाय या रॅलीत सहभागी झाला.