रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
कोपरगाव तालुक्यातून जाणार्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर 1 जानेवारी 24 ते 31 डिसेंबर 24 या वर्षभरात बाभळेश्वर महामार्गाच्या पोलिसांनी कोपरगाव तालुका हद्दीत तब्बल 62 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. नोपार्किंग, अतिवेग व सीटबेल्टचा वापर न करणार्या हजारो वाहनचालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.कोपरगाव ह्द्दीत वर्षभरात 14 अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 26 जखमी झाले होते. 2023 मध्ये 40 लाख दंड झाला होता 2024 मध्ये त्यात 22 लाखांची वाढ झाली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे 30 किलोमीटर अंतर आहे. मुंबईच्या दिशेने जाताना नाशिक जिल्ह्याची हद्द तर नागपूरला जाताना छत्रपती संभाजीनगरची हद्द येते. कोपरगाव तालुक्यात जेऊरकुंभारी येथे इंटरचेंज आहे. दोन्ही बाजूला जाणार्या वाहनाची वर्षभरात मोठी वर्दळ असते. या महामार्गावरून प्रवास करणारी अनेक वाहने वेगमर्यादा सोडून धावतात. नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. यातून अनेकांनी आपला जीव देखील गमावला. या अमर्यादित वेगामुळे व नो पार्किंगमुळे होणार्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी बाभळेश्वर महामार्ग पोलिसांनी शासनाच्या वाहतूक नियमानुसार वेगमर्यादा निश्चित करून महामार्गावर सुसाट धावणार्या वाहनचालकावर जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षभरात ही दंडात्मक कारवाई केली आहे.
तसेच 12 हजार 230 वाहनांच्या टायरची व 421 वाहन चालकांची ब्रेथअनालायझर तपासणी करण्यात आली. दरम्यान 2023 या वर्षाच्या तुलनेत 2024 मध्ये वाहनावरील कारवाई व दंडाची रक्कम वाढली आहे. त्याचबरोबर वर्षभरात वेगवेगळ्या बेजबाबदारपणे वाहन चालवून झालेल्या अपघातात काही वाहनधारकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नोपार्किंगसाठी 570 वाहनांसाठी 4 लाख 79 हजार, अतिवेगासाठी 2 हजार 227 वाहनांसाठी 44 लाख 64 हजार, सीटबेल्टचा वापर न करणार्या 1 हजार 326 वाहनांसाठी 13 लाख 26 हजार असा दंड करण्यात आला आहे. तर वर्षभरात कोपरगाव हद्दीत 14 अपघात झाले असून यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 26 जण जखमी झाले आहेत. ट्रक, बस, टेम्पो सह इतर अवजड वाहनांसाठी ताशी 80 किलोमीटर तर कार, जीप ताशी 120 किलोमीटर वेगमर्यादा निश्चित केलेली आहे. अतिवेगासाठी कार व जीपला दोन हजार तर ट्रक, बस, टेम्पोसाठी चार हजार रुपये दंड आहे.तर सर्वच प्रकारच्या वाहनांना नो पार्किंगसाठी पाचशे ते दिड हजार रुपये दंड आहे.
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करत व वेगमर्यादा पाळणे गरजेचे आहे. नियम पाळले गेले नाही तर अडचण निर्माण होते. कारवाईस सामोरे जावे लागते. अनेक अपघात हे वाहनचालकास झोप किंवा डुलकी लागल्याने होत आहेत. वाहन चालविताना झोप येवू नये व वाहनचालकांचे लक्ष वेधून घेतले जावे, तसेच त्यांनी व्यवस्थित वाहन चालवावे याकरिता एमएसआरडीसीच्या मदतीने महामार्गावर ठिकठिकाणी विविध रंगांचे झेंडे, टायरची गोल व रंगीबेरंगी डिझाईन, वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
– विशाल सणस, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस.