कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील देर्डे-कोर्हाळे (Derde-Korhale) हद्दीतील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) केमिकल घेऊन जाणारे आयशर टेम्पोने अचानक पेट (Tempo Fire) घेतल्याने एकच खळबळ उडाली. काही वेळातच आगीने संपूर्ण आयशर टेम्पोला वेढले. आगीच्या उंच ज्वाळा सर्वत्र दिसू लागल्या. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र आग इतकी भीषण होती की, त्यावर रात्री 8 वाजता लागलेल्या आगीवर 2 वाजता नियंत्रण मिळण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत गर्दी नियंत्रणात आणली. आयशर चालक घटनास्थळावरून धूम ठोकली असून सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
छत्रपती संभाजीनगरकडून (Chhatrapati Sambhajinagar) मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो एम एच 20 जि सी 3817 हा केमिकल घेऊन समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Highway) जात असताना देर्डे नजीक केमिकला अचानक आग लागली. प्रसंगावधान राखत चालकाने वाहन थांबवत बाहेर उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले.गाडीत केमिकल असल्याने आग आणखी भडकली आणि काही क्षणात आगीचा आगडोंब उसळला. शिर्डी टोल प्लाझा, सिन्नर टोल प्लाझा, सिन्नर नगरपालिका, कोपरगाव नगरपालिका, साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपालिका, श्रीरामपूर नगरपालिका, राहता नगरपालिका व गोदावरी बायो रिफायनरी आदी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करूनही आटोक्यात येत नव्हती.
अखेर 6 तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री दोन वाजेच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस यांच्यासह सिन्नर ग्रामीण पोलीस, समृद्धी हायवे पोलीस, शिर्डी (Shirdi) व सिन्नर पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा दल आदींनी घटनास्थळी दाखल होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तरी संबंधित वाहन जळून खाक झाले. मात्र आग कशामुळे लागली व गाडीत कोणते केमिकलं होते यांचा अद्याप तपास लागलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
या आगीमुळे मुंबईच्या दिशेने जाणारी संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर सहा तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी 500 ते 600 वाहने खोळंबली होती.