वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक 18 जवळ हडसपिंपळगाव येथे वाहन अडवून चालकाला मारहाण करत गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून नेणार्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला. स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांच्या विविध पथकांनी दिल्ली, नाशिक आणि बीड जिल्ह्यांत धडक कारवाई करत पाच आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची एक्सयूव्ही-700 गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
26 ऑगस्ट 2026 रोजी राहुरी, जि. अहिल्यानगर येथील फिर्यादी आपल्या वाहनातून समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. हडसपिंपळगावजवळील एक्झिट क्रमांक 18 परिसरात अज्ञात आरोपींनी त्यांचे वाहन अडवले. ड्रायव्हर सीटवर बसलेल्या फिर्यादीने कारची काच खाली करताच आरोपींनी त्यांच्या कानशिलात मारली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील अंदाजे 1 लाख 50 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून आरोपी पसार झाले. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.
या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी 29 ऑगस्ट रोजी किरण अजिनाथ गायकवाड (25, रा. हिवरसिंगा, ता. शिरूर कासार, जि. बीड) याला रायमोहा, ता. शिरूर कासार येथून शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर या लुटीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींबाबत पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील सराईत आरोपी परशुराम मोहन गायकवाड हा आपल्या साथीदारासह दिल्लीला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. पथकाने दिल्ली गाठून प्रसादनगर परिसरात कारवाई केली आणि परशुराम मोहन गायकवाड (26, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) तसेच करण भरत जाधव (22, रा. मिडसावंगी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर, ह.मु. बीड) यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, अन्य आरोपींचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनिल जयराम जाधव याला नाशिक जिल्ह्यातील येवला येथून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ही कारवाई करताना गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची एक्सयूव्ही-700 गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसर्या पथकाने पंडित उर्फ चन्नाअप्पा सखाराम लष्करे (रा. सैनिक विद्यालय परिसर, बीड) याचा शोध घेत त्याला बीड शहरातून ताब्यात घेतले. आजपर्यंत या प्रकरणात परशुराम मोहन गायकवाड, करण भरत जाधव, किरण अजिनाथ गायकवाड, अनिल जयराम जाधव आणि पंडित उर्फ चन्नाअप्पा सखाराम लष्करे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या उर्वरित आरोपींचा कसोशीने शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेला परशुराम मोहन गायकवाड हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण, बीड, पुणे, बुलढाणा, धाराशिव, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच बीड जिल्ह्यात त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईत तो फरार असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंत आरोपींचा माग काढला. रायमोहा, बीड, दिल्ली, येवला अशा विविध ठिकाणी स्वतंत्र पथके पाठवून कारवाई करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या पथकांच्या समन्वयातून अवघ्या तीन दिवसांत पाच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे, महेश घुगे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, वैजापूर पोलीस ठाणे, सायबर पोलीस आणि तांत्रिक विश्लेषण विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी केली. या पथकात भरत निकाळजे, स.फौ. थोटे, पोलीस हवालदार विष्णू गायकवाड, रविंद्र लोखंडे, अशोक वाघ, शिवानंद बनगे, विठ्ठल डोके, गोपाल पाटील, सुनील गोरे, सचिन राठोड, सचिन सोनार, संतोष डोंगरे, विजय धुमाळ, दीपक सुरोशे, भागीनाथ आहेर, महेश बिरुटे, अनिल काळे, सनी खरात, बलवीरसिंग बहुरे, कविता पवार, निलेश कुडे, शिवाजी मगर, संदीप कोळगे, संजय तांदळे तसेच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक युवराज पाडळे, पोलीस हवालदार अमोल कांबळे, प्रशांत गित्ते, ज्ञानेश्वर मेटे आणि सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पवार, पोलीस हवालदार मुकेश वाघ, राजेश राठोड यांच्यासह तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस उपनिरीक्षक मेघा माळी, योगेश तरमळे आणि जीवन घोलप यांनी केली.




