Thursday, October 22, 2026
HomeनगरKopargaon : समृद्धी महामार्गावरील चाकूच्या धाकाचा दरोडा उघडकीस

Kopargaon : समृद्धी महामार्गावरील चाकूच्या धाकाचा दरोडा उघडकीस

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई || सराईत 4 आरोपी ताब्यात, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

समृद्धी महामार्गावर आयशर वाहन दुरुस्त करणार्‍या मेकॅनिक व त्याच्या साथीदारांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लुटणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार आहेत.

- Advertisement -

8 सप्टेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास फिर्यादी अभिषेक मच्छिंद्र गायकवाड (वय 20, रा. पिंपळवाडी रोड, साकुरी, ता. राहाता) हे समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक 508 येथे आयशर कंपनीच्या वाहनाची दुरुस्ती करत होते. त्यावेळी सहा अज्ञात व्यक्तींनी तेथे येऊन फिर्यादी व साक्षीदारांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चार तपास पथके तयार केली. या पथकांनी घटनास्थळी पाहणी करत गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळविण्यासोबतच तांत्रिक विश्लेषण केले. तसेच समृद्धी महामार्गावरील तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांतील फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. चार दिवसांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर 11 सप्टेंबर रोजी आरोपींबाबत पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली.

त्यानुसार कोपरगाव ते शिर्डी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ, कोकमठाण गावच्या शिवारात मोटारसायकलसह थांबलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे धनंजय उर्फ धनु प्रकाश काळे (वय 27), स्वप्नील संतोष भारूड (वय 20), प्रशांत जालिंदर भारूड (वय 20) आणि शिवरंजन राजेश शिंदे (वय 22) अशी आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता धनंजय उर्फ धनु काळे याने अन्य आरोपींसह चंदू नारायण तहकीक (रा. सावळीविहीर, ता. राहाता) आणि त्याच्या एका मित्राच्या मदतीने दरोडा केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चंदू तहकीक व त्याचा मित्र सध्या फरार आहेत.

आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेले दोन मोबाईल, 2 हजार रुपये रोख आणि 80 हजार रुपये किमतीची हिरो प्लेंडर मोटारसायकल (एमएच-17-डीपी-3213) असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपींना जप्त मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यातील धनंजय उर्फ धनु काळे आणि स्वप्नील भारूड हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा, चोरी, घरफोडी, मारहाण आदी स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 12 जागांसाठी उमेदवार जिल्हा बँकेच्या आखाड्यात; कोण कोण झाले...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूूक बिनविरोधचा फुसका बार फुसका ठरला....