Monday, November 2, 2026
HomeनगरShrirampur : पाण्यासाठी शेतकर्‍यांचा समृद्धी महामार्गावर ठिय्या

Shrirampur : पाण्यासाठी शेतकर्‍यांचा समृद्धी महामार्गावर ठिय्या

महिला आंदोलकांचे अडीच तास आंदोलन || शेतकर्‍याला मारहाण झाल्याचा आरोप

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नांदूर मधमेश्वर कालव्यातून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांसाठी पाणी सोडण्याच्या मागणीवरून सुरू असलेले आधार जलदूत समितीचे आंदोलन शनिवारी आक्रमक झालेले बघायला मिळाले. जांबरगाव हद्दीत महिला आंदोलकांनी थेट समृद्धी महामार्गावर ठिय्या दिला. तब्बल अडीच तास हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेत असताना चिंचडगाव येथील शेतकरी अनिल काळे हे जखमी झाले असून, पोलिसांनी डोक्यात लाठी मारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर आंदोलकांनी वैजापूर पोलीस ठाण्यातही ठिय्या दिला.

- Advertisement -

रब्बी हंगामातील पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आधार जलदूत समितीचे पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 27 ऑक्टोबर रोजी शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र, प्रशासनाचे अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने त्याच दिवशी सायंकाळपासून कालवा विभागाच्या कार्यालयासमोर पंडित शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाला सहा दिवस उलटूनही अधिकारी व कर्मचारी आंदोलकांशी चर्चेलाही आले नाही.ज्यामुळे शेतकर्‍यांनी शुक्रवारी लाडगाव,चौदा मैल या ठिकाणांसह 9 ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले.मात्र यानंतरही प्रशासन चर्चेला आले नाही

शुक्रवारी 9 ठिकाणी आंदोलन झाले मात्र प्रशासनाने दाद न दिल्याने शनिवारी शेतकरी आंदोलकांनी जांबरगाव हद्दीत समृद्धी महामार्गावर धडक देत रस्त्याच्या एका बाजूला ठिय्या दिला. पोलिसांच्या मोठ्या फौजदाराला चकवा देत शेतकर्‍यांनी हे आंदोलन केले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अरुण जर्‍हाड, तहसीलदार सुनील सावंत आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी सोडण्याची निश्चित तारीख जाहीर करा, या मागणीवर आंदोलक ठाम राहिले. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप आणि अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. येत्या 2 नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन पाणी सोडण्याच्या मागणीवर चर्चा केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, ठोस निर्णय मिळत नसल्याने आंदोलकांनी महामार्गाच्या संपूर्ण रस्त्यावर बसण्याचा प्रयत्न केला.

यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे आणि जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेऊ नये, अशी विनंती केली. दरम्यान, महिला आंदोलकांना ताब्यात घेताना चिंचडगाव येथील शेतकरी अनिल काळे यांनी पोलिसांना जाब विचारला. यावेळी त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी डोक्यात लाठी मारल्याचा आरोप काळे यांनी केला असून, त्यांच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्गावरून ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना वैजापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, तेथेही आंदोलकांनी ठिय्या देत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.

शेतकर्‍यांना ताब्यात घेण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करत पाणीप्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, आमरण उपोषणामुळे पंडित शिंदे यांची प्रकृती खालावत असल्याने नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी त्यांना सलाईन लावण्याची विनंती केली. त्यानंतर शिंदे यांनी सलाईन लावण्यास संमती दिली.एकीकडे शेतकर्‍यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे, तर दुसरीकडे आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईमुळे वातावरण तापले आहे. आता 2 नोव्हेंबर रोजी होणार्‍या बैठकीत प्रशासन पाणी सोडण्याबाबत काय निर्णय घेणार, याकडे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी आज मतदान

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्याच्या सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणार्‍या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, सोमवार (दि. 2) मतदान होत आहे. बँकेची निवडणूक...