Saturday, June 20, 2026
HomeमनोरंजनSanchita Ugale : चित्रपटसृष्टीत मानसिक छळ? संचिता उगले मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण,...

Sanchita Ugale : चित्रपटसृष्टीत मानसिक छळ? संचिता उगले मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांनी सगळ सांगितलं

मुंबई । Mumbai

‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि अभिनेता विक्की कौशलसोबत स्क्रीन शेअर करणारी अत्यंत प्रतिभावान व तरुण अभिनेत्री संचिता उगले हिच्या अकाली निधनाने टीव्ही तसेच चित्रपटसृष्टी हादरली आहे. अवघ्या २२ व्या वर्षी एका उमलत्या ताऱ्याने जगाचा निरोप घेतल्याने मनोरंजन विश्वात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. नालासोपारा येथील राहत्या घरी संचिता मृतावस्थेत आढळली. वरकरणी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असले, तरी तिच्या कुटुंबाने केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

- Advertisement -

संचिताच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत आपला संताप आणि दुःख व्यक्त केले. संचिताच्या मावशीने इंडस्ट्रीतील अंतर्गत वातावरणावर अत्यंत गंभीर बोट ठेवले आहे. “संचिता गेल्या २ ते ४ महिन्यांपासून कमालीची चिंतेत आणि तणावाखाली असायची. इंडस्ट्रीमधीलच कोणीतरी व्यक्ती तिला सातत्याने मानसिक त्रास आणि टॉर्चर करत होती,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जर तिने हा त्रास आधीच घरी सांगितला असता, तर आम्ही वेळीच काहीतरी पाऊल उचलू शकलो असतो. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून संचिताला मानसिक छळ देणाऱ्या गुन्हेगाराला कडक शिक्षा करावी, जेणेकरून भविष्यात इतर कोणत्याही मुलीवर अशी वेळ येणार नाही.

संचिताच्या वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीला गमावल्याचे अतीव दुःख व्यक्त करताना कामाच्या ठिकाणच्या जाचावर प्रकाश टाकला. त्यांच्या सांगण्यानुसार, संचिता तशी नेहमी आनंदी असायची, पण काही काळापासून ती अचानक डिप्रेशनमध्ये (उदासीनता) जायची. मुलीची ही अवस्था पाहून वडील स्वतः तिच्या सुरक्षेसाठी दररोज तिच्यासोबत कामाच्या ठिकाणी अप-डाऊन करत असत. “कामाच्या ठिकाणी संचिताला पैशांच्या व्यवहारावरून किंवा इतर काही कारणांमुळे सतत टॉर्चर आणि हॅमरींग (मानसिक दबाव) केले जात होते. माझ्या मुलीच्या मृत्यूचे गूढ उकललेच पाहिजे आणि देशातील अशा प्रत्येक पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे,” अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला दिली आहे.

संचिताची सह-कलाकार जसिका हिने या घटनेवर तीव्र धक्का व्यक्त केला आहे. जसिकाच्या मते, संचिता अत्यंत मजबूत आणि सकारात्मक विचारांची मुलगी होती. ती नेहमी सेटवर सगळ्यांशी मिळूनमिसळून वागायची, त्यामुळे ती असे टोकाचे पाऊल उचलू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. मनोरंजन क्षेत्रातील कामाच्या पद्धतीवर (Work System) तीव्र आक्षेप घेत जसिका म्हणाली की, आता इंडस्ट्रीतील कामाचे वातावरण सुधारण्याची प्रचंड गरज आहे, जेणेकरून कोणत्याही कलाकाराला अशा मानसिक दबावाचा सामना करावा लागणार नाही. या संपूर्ण प्रकरणाने कलाविश्वातील कलाकारांच्या मानसिक आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, संचिताच्या फोनचे रेकॉर्ड्स आणि संशयास्पद व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या