दुर्दैवी घटना टळली मात्र दोन्ही बैल जखमी
अकोले (प्रतिनिधी)- अगस्ती आश्रम परिसरातून अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारी बैलगाडी शहरातील अगस्ती सेतू पुलाच्या कॉर्नरला उतार असल्याने गाडी थांबविता आली नाही. त्यामुळे बैलगाडी थेट प्रवरा नदीत जाऊन कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही मात्र दोन्हीही बैल गंभीर जखमी झाले आहेत.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या महिन्यातच अकोले शहरात महात्मा फुले चौकात आंबड येथील नागरिकाच्या बैलगाडी अंगावर आल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले होते. उतारावर बैलगाडी थांबविणे शक्य होत नसल्याने अशा प्रकारचे अपघात होत आहेत. कालअगस्ती आश्रम परिसरात ऊसतोड सुरू होती.
उसाची बैलगाडी ही खानापूर मार्गे मोठ्या पुलावरून जाणे अपेक्षित असताना बैलगाडी चालकाने आपली उसाची बैलगाडी प्रवरा नदीवरील छोट्या पुलावरून उतारावरून खाली आणत असताना दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास पुलाच्या सुरुवातीच्या बाजूने बैलगाडी प्रवरा नदीत कोसळली.
यावेळी उसाच्या गाडीवर बसलेल्या ऊस वाहतूकदाराने गाडीवरून उडी मारली. या अपघातात दोन्हीही बैल जखमी झाले. गाडीतील ऊस व गाडी नदीत कोसळली. यावेळी उपस्थित नागरिकांनी जखमी बैलांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने अपघातस्थळी अधिकारी-कर्मचारी पाठविले. त्यांनी नदीत व बैलांच्या अंगावर पडलेला ऊस बाजूला करून दुसर्या गाडीत टाकण्यास मदत केली.
दरम्यान याच वेळी अगस्ती कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री मधुकरराव पिचड हे अगस्ति आश्रमातून एक कार्यक्रम संपवून अकोलेकडे येत असताना त्यांनीही अपघातस्थळी थांबून माहिती घेतली व संबंधित ऊस वाहतूक करणार्या बैलगाडी चालकाची विचारपूस केली. उपस्थित करखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना जखमी बैलांच्या उपचारार्थ मदत करण्याच्या सूचना दिल्या.कारखान्याचे व्हा. चेअरमन सीताराम गायकर यांनीही सदर अपघाताची माहिती घेतली.