अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य सरकारने सुधारित वाळूधोरण जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नगर जिल्ह्यातील 12 वाळू साठ्यांचे (रेती डेपोचे) ऑनलाइन पद्धतीने लिलाव करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. यात जिल्ह्यातील बारा वाळूसाठेंचे 9 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने ई- लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात सहभागी होवून पात्र ठरणार्यांना 2025- 2026 या कालावधीत वाळू उपसा करून विक्रीचा परवाना मिळणार आहे.
राज्य सरकारच्या धडसोड वृत्तीमुळे गेल्या वर्षभरापासून नगर जिल्ह्यात वाळूडेपाचे लिलाव होऊ शकले नव्हते. त्यातच राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर नव्याने महसूल मंत्री पदाची सूत्रे हाती घेतलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधारित वाळू धोरण जाहीर केले. राज्य पातळीवरून वाळू धोरण निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा वाळू साठ्यांचा ऑनलाईन पद्धतीने लिहिला होणार आहे. यासाठी जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेने वेळापत्रक तयार करण्यात आले असून यात 19 मे पासून जिल्ह्यातील वाळू साठ्यांच्या लिलावासाठी ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध होणार्या निवेदनुसार संबंधितांना दोन जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्ती अथवा संस्था यांना वाळू साठ्याच्या लिलाव रकमेच्या 25 टक्के इसारा जिल्हा गौणखनिज विभागाकडे जमा करण्याची बंधनकारक ठेवण्यात आले आहे. याच काळात संबंधित व्यक्ती अथवा संस्थेला वाळू लिलाव ठेका घेण्यासाठी तांत्रिक लिफाफा सादर करावा लागणार आहे.
आज 23 मे रोजी जिल्हा पातळीवरती वाळूसाठा लिलाव पूर्व बैठक होणार असून या बैठकीत वाळू साठ्याच्या लिलावाची तयारी करण्यात येणार आहे. त्यानंतर चार ते सहा जून या कालावधीत वाळू साठा लिलाव घेण्यासाठी दाखल ऑनलाइन निविदा जाहीर करण्यात येणार आहे. यात पात्र ठरणार्या ई-निविदांची छानणी करण्यात येणार आहे. ही छानणी पूर्ण झाल्यानंतर पात्र निविदाधारकांची 9 जून रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार्या वाळूसाठा ई-लिलावात सहभागी होता येणार असल्याचे जिल्हा गौण खनिज विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
या ठिकाणाच्या वाळूचा होणार लिलाव
कर्जत प्रांत कार्यालयातंर्गत कर्जत तालुक्यातील नागलवाडी, श्रीगोंदा- पारनेर प्रांत कार्यालयातंर्गत पारनेर तालुक्यातील तास (दोन ठिकाणी), पळशी, नागापूरवाडी, मांडवे खु., पळशी देसवंडे गावाच्या हद्दीत क्रमांक 1 ते 4 या ठिकाणी तर श्रीरामपूर प्रांताधिकारी यांच्या अंतर्गत राहुरी तालुक्यातील जातप क्रमांक 2 आणि देसवंडी या ठिकाणी अशा 12 ठिकाणच्या वाळूचा लिलाव प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे.
लिलावात संगमत करणार्यांवर होणार कारवाई
जिल्ह्यात होणार्या वाळू लिलावात निविदा भरून सहभागी होणार्या संबंधीतांनी संगमत करून शासनाचा महसूल बुडवण्यास प्रयत्न करणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून वाढीव बोली लावण्यानंतर एकादा लिलावात सहभागी होवून दुसर्यांदा बोली न लावणार्यांना राज्यभरात काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
शासकीय लिलावात सहभागी होणार्या ठेकेदार यांना लिलावा झाल्यानंतर शासनाच्या घरकुल योजनेसाठी ठरवून दिलेली वाळू उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती तैनात राहणार राहणार असल्याचे गौणखनिज विभागाकडून सांगण्यात आले.